पानशेत रस्त्यासह पुलांची कामे ठप्पच | पुढारी

पानशेत रस्त्यासह पुलांची कामे ठप्पच

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही हजारो पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ असलेल्या पुणे -पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील पूल, गोर्‍हे बुद्रुक आदी ठिकाणची कामे ठप्प आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. सर्वांत गंभीर परिस्थिती खानापूर-मणेरवाडी येथील ओढ्यावरील पुलाची आहे. अर्धवट पुलामुळे खोल ओढ्यात वाहने कोसळून दुर्घटनांची टांगती तलवार प्रवाशांवर उभी आहे. पावसाळा तोंडावर येऊनही गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे.

खडी, मुरमाचे ढिगारे दोन्ही बाजूला पडले आहेत. पुलावर एकाच बाजूने खामगाव रांजणे व पानशेत बाजूंकडून वाहने भरधाव वेगाने येतात. त्यामुळे समोरासमोर धडक होत आहेत. वाहनचालकांसह पायी ये-जा करणार्‍यांना कसरत करावी लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवला आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात जुना पूल पाण्याखाली बुडाल्याने काही काळ वाहतूक बंद होऊन पानशेत, खामगाव भागाचा संपर्क तुटला होता.

पावसाळ्यानंतर पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले होते. काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर यांनी दिला आहे. खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते यांनीही हीच मागणी केली. तब्बल दोनशे कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण केले. खडकवासला, गोर्‍हे बुद्रुक तसेच ठिक-ठिकाणच्या अर्धवट कामांचा अपवाद वगळता रस्ता चकाचकीत झाला. त्यामुळे भरधाव वाहने धावत आहेत. दुसरीकडे अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे काम करण्यासाठी गोर्‍हे बुद्रुक ग्रामस्थांनी आंदोलन करूनही काम ठप्प आहे.

Back to top button