शिवरायांचा वळतीतील अश्वारूढ पुतळा; हरियाणाच्या व्यावसायिकाला भुरळ | पुढारी

शिवरायांचा वळतीतील अश्वारूढ पुतळा; हरियाणाच्या व्यावसायिकाला भुरळ

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सध्या गहू मळणीचा हंगाम सुरू असून, गावोगावी पंजाब, हरियाणातून हार्वेस्टर दाखल झाली आहेत. दिवसभर हार्वेस्टर चालक, मालक हे गव्हाचे शेत शोधून आपला व्यवसाय करत असतात. मात्र, वळती येथे आलेल्या एका हार्वेस्टर मालकाने व्यवसायासोबतच एक अनोखी कृती करून येथील मातीचे ऋण फेडण्याचा व छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केला. या हॉर्वेस्टर मालकाला गावात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची भुरळ पडली आणि त्याने छत्रपतींच्या प्रवेशद्वारासाठी 11 हजार रुपयांची देणगी ग्रामस्थांकडे सुपूर्त केली.

जोगा सिंह (रा. इस्माईलपूर, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा) असे देणगी देणार्‍या हॉर्वेस्टर मालकाचे नाव आहे. जोगा सिंह हे 2009 पासून दरवर्षी आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गहू मळणीच्या कामासाठी येतात. सध्या वळती ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. या कामासाठी ग्रामस्थांनी तब्बल 50 लाख रुपये खर्च केला.

हा भव्य-दिव्य अश्वारूढ पुतळा व प्रवेशद्वार जोगा सिंह यांना आवडले. त्यांना शिवरायांच्या कार्याची माहिती असून, त्यांचा इतिहासदेखील ज्ञात आहे. त्यांनी ग्रामस्थांकडून कामाची माहिती घेत कौतुक केले. या वेळी त्यांनी पुतळा व प्रवेशद्वारासाठी 11 हजार रुपयांंची देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी ग्रामस्थांकडे रक्कम सुपूर्त केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोर, अर्जुन अजाब, वामनराव वाळुंज, गणपत लोंढे आदी उपस्थित होते.

Back to top button