

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर शहरातील वाघजाईनगरमध्ये अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला वेळोवेळी सांगूनदेखील काहीही कार्यवाही होत नसल्याने नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
भोर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक 8 मधील वाघजाईनगरला होणाऱ्या नळ पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जवळून ड्रेनेज लाईन गेली आहे.
या जलवाहिनीत ड्रेनेजमधील दूषित पाणी जाऊन पिण्याचे पाणी दूषित होऊन त्याचा वापर वाघजाईनगरमधील नागरिकांना करावा लागत आहे. परिणामी, साथीचे आजार पसरले आहेत. वाघजाईनगरजवळ 300 नागरिकांचे वास्तव्य आहे. तसेच भोर शहराचे जागृत देवस्थान श्री वाघजाई देवीचे मंदिरदेखील याच ठिकाणी तेथे येणारे भाविक याच पाण्याचा वापर करतात. या परिसरात नगरपरिषदेच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकांना पाणीपुरवठा होत असल्यामुळे याचा वापर ग्राहक करतात. परिणामी, साथीचे आजार इतरत्र पसरण्याचीदेखील दाट शक्यता आहे.
फार वर्षांपूर्वीची ही जुनी जलवाहिनी असून, यामधील त्रुटी सापडण्यात विलंब लागत आहे. ड्रेनेज वाहिनीत दूषित पाणी मिसळत आहे. आता या जलवाहिनीपासून तेथून काढून स्वच्छता करून वाघजाईनगरला शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करीत आहोत.
– सुमंत शेटे, नगरसेवक, भोर नगरपरिषद.
स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून ड्रेनेज लाईनचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. दूषित पाण्याचा फॉल्ट काढून शुद्ध पाणी देण्यात येईल.
– हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी, भोर नगरपरिषद.