सतरा दिवसांत 2023 कि. मी. प्रवास; ‘पुणे ते नेपाळ’ सायकल मोहीम | पुढारी

सतरा दिवसांत 2023 कि. मी. प्रवास; ‘पुणे ते नेपाळ’ सायकल मोहीम

सुनील जगताप

पुणे : विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती समाजात विधायक बदल घडवितात आणि अशा व्यक्ती एकत्र येऊन बनलेला समूह इतिहास घडवितो. असाच एका ध्येयाने प्रेरित झालेला ग्रुप म्हणजे पुणे येथील ‘मराठा वॉरिअर्स.’ अनेक साहसी मोहिमा यशस्वी केल्यानंतर या ग्रुपने या वर्षी पुन्हा एकदा पुणे ते नेपाळ सायकल प्रवास मोहीम पूर्ण केली आहे.

भोसरी (पुणे) येथील पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या सायकल मोहिमेत संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली बजरंग मोळक, विश्वास काशीद, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, नारायण मालपोटे, नीलेश धावडे हे वॉरिअर्स सहभागी झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे 2023 या वर्षातील मराठा वॉरिअर्सची ही पहिली मोहीम. विशेष म्हणजे पुणे ते नेपाळ या मोहिमेचे अंतरदेखील 2023 किलोमीटर आहे.

दोन देशांना जोडणार्‍या या प्रवासात सर्व सहभागी वॉरिअर्स मैत्रीचा, सामाजिक एकतेचा संदेश देत, भारताने 75 वर्षात केलेल्या प्रगतीचा आलेख सर्वदूर पोहोचविणार आहेत. पुणे येथून सुरुवात झालेली ही मोहीम पुढे इंदोर (मध्य प्रदेश), अयोध्या (उत्तर प्रदेश) अशी तीन राज्यांतून प्रवास करत नेपाळमधील काठमांडू शहरात सतरा दिवसांत पोहोचली.

Back to top button