बारामती: उंडवडीतील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी दोन वायरमनवर गुन्हा | पुढारी

बारामती: उंडवडीतील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी दोन वायरमनवर गुन्हा

बारामती, पुढारी वृत्तसेवा: वीजेच्या खांबावर शेतकऱ्याला चढायला लावून त्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा वायरमन विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप भापकर व सचिन माने अशी गुन्हा दाखल झालेल्या वायरमनची नावे आहेत. या घटनेत विजय मुरलीधर गवळी (वय ५४, रा. उंडवडी सुपे, ता. बारामती) या शेतकऱ्याचा मंगळवार ४ एप्रिल रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थ व कुटुंबियांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी भापकर व माने या दोन वायरमनवर गुन्हा दाखल झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात विजय यांचे बंधू पोपट मुरलीधर गवळी यांनी फिर्याद दिली.

विजय यांनी यापूर्वी वीजेचे खांब उभे करण्याचे काम केलेले असल्याने खांबावर चढून इलेक्ट्रीक कामे करणे त्यांना शक्य होत असे. या भागात वीजेची काही समस्या निर्माण झाल्यास महावितरणचे वायरमन त्यांना कामासाठी बोलवत असे. ४ एप्रिल रोजी फिर्यादीने भावाला कारखेलला जाऊन तलाठी कार्यालयातील काम करून ये, असे सांगितले. परंतु वायरमनचा फोन आल्याने मी तिकडे वीजेचे काम करायला जात असल्याचे विजय म्हणाले. ते वीजेच्या खांबावर काम करत असताना त्यांना वीजेचा धक्का बसला. यात ते भाजले. खांबावरून खाली पडल्याने त्यांना जोराचा मार लागला. त्यांना उपचारासाठी बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

वीजेच्या खांबावरील तारांचे काम करण्यासाठी त्यांना सांगितले असतानाच अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने हा प्रकार घडला. विजय गवळी यांच्या मृत्यूस दोन वायरमनच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button