बारामती: ३० हजारात इलेक्ट्रीक गाडी देतो म्हणत ग्राहकांना घातला २० लाखांचा गंडा

file photo
file photo

बारामती, पुढारी वृत्तसेवा: इलेक्ट्रीक गाड्यांच्या बुकींगपोटी ८१ ग्राहकांकडून रक्कम घेत त्यांची १९ लाख ६७ हजारांची फसवणूक करण्यात आली. कर्मचाऱ्यांचाही तीन महिन्यांचा सुमारे दीड लाख रुपये पगार न देता फसवणूक केल्याचा प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी जोव्ही इलेक्ट्रीक लिमिटेडच्या चेअरमन ज्योती सतीश आढाव व सीईओ विनोद अनंता कदम (रा. सिंहगड रोड, नांदेड सिटी, पुणे) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सुहास सुरेश हिप्परकर (रा. कळंब, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. २४ ऑक्टोबर २०२२ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत बारामतीत ही घटना घडली.

फिर्यादी हे बारामतीत जोव्ही इलेक्ट्रीक बाईक्स आऊटलेटमध्ये बिझनेस डेव्हलप मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्यासह अन्य स्टाफ येथे कार्यरत होता. जोव्ही इलेक्ट्रीक्स लिमिटेडच्या दुचाकींचे येथे बुकींग घेतले जात होते. या वाहनाची किंमत ९० हजार रुपये होती. परंतु लोकांना आकर्षित करण्यासाठी आढाव व कदम या दोघांनी बुकींग करणाऱ्याला ३० हजारात गाडी देण्याचे मान्य केले होते. बुकींगनंतर चार महिन्यात गाडी दिली जाणार होती. त्यानुसार येथील आऊटलेटमध्ये बुकींग सुरु करण्यात आले.

सुरुवातीला ज्यांनी बुकींग केले त्यांचा व इतरांचा विश्वास बसावा, यासाठी काही गाड्या वितरीत करण्यात आल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. अवघ्या ३० हजारात गाड्या मिळत असल्याने बुकींग वाढले. बुकींगची रक्कम ऑनलाईन, चेक किंवा रोख स्वरुपात घेतली जाऊ लागली. त्यानुसार येथील आऊटलेटमध्ये ८१ ग्राहकांची १९ लाख ६७ हजारांची रक्कम घेतली गेली. वारंवार वाहनांची मागणी करूनही पुरवठा करण्यात आला नाही. अखेर बारामतीतील शोरुमला टाळे लावण्यात आले. या कंपनीने फिर्यादीसह येथे कार्यरत अन्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी ते मार्चचा सुमारे दीड लाख रुपये पगारही दिला नाही. फिर्यादी व अन्य कर्मचारी स्थानिक असल्याने बुकींगसाठी रक्कम भरलेल्यांनी त्यांच्याकडेच तगादा सुरु केला. कंपनीच्या चेअरमन व सीईओ यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

अनेकांची रक्कम बुडाली

जोव्ही इलेक्ट्रीक बाईक नोंदणीसाठी बारामतीत अनेक ग्राहकांनी आपली ३० हजारांची रक्कम भरली होती. परंतु येथील आऊटलेट बंद करण्यात आले. शिवाय वाहन दिले गेले नाही. त्यामुळे अनेकांची रक्कम बुडाली. या घटनेमुळे बारामतीतील फसवणूकीचे प्रकार थांबत नसल्याचेही पुढे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news