

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गाच्या दुतर्फा कचर्याचे ढीग साचले आहेत. कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली आहे. नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कचरा टाकणा-यांवर काहीही कारवाई करीत नाही. नाशिकफाटा ते राजगुरूनगरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र कचर्याचे ढीग साचल्याने महामार्गाला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन ठप्प झालेले दिसत आहे.
कचर्याच्या ढिगावर भटकी कुत्री, डुकरे घुटमळतात आणि कचरा अस्तव्यस्त करतात. कचर्याच्या ढिगातून अतिशय दुर्गंधीयुक्त वास येतो. महामार्गाकडेला पडलेला कचरा उचलण्याची जबाबदारी नक्की कोणाची हेदेखील कळत नाही. स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद प्रशासन हतबल झालेले दिसत आहे. त्यांच्याकडून कचरा टाकणार्यांविरोधात कारवाई करण्याची हिंमत झालेली नाही. त्यामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या कचर्याच्या ढिगात दररोज वाढ होताना दिसत आहे.
अधिकार्यांना कचर्याचे ढीग दिसत नाहीत का?
नाशिक फाटा ते राजगुरूनगरदरम्यानचा महामार्ग कचरामुक्त कधी होणार ? तत्कालीन पालकमंत्र्यांनी कचरामुक्त पुणे जिल्हा करणार असल्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून कचरा निर्मूलनाबाबत ठोस उपाययोजना होत नाही. महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही दररोज महामार्गवरून जातात. मग त्यांना रस्त्याच्या कडेला साचलेले ढीग दिसत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.