पारगाव : तमाशा कलावंतांवर शेळ्या वळण्याची स्थिती | पुढारी

पारगाव : तमाशा कलावंतांवर शेळ्या वळण्याची स्थिती

किशोर खुडे

पारगाव : तमाशाचे बदललेल्या स्वरूपामुळे तमाशात काम मिळत नसल्याने तमाशा कलावंत कुंडलिक शेवाळे (वळतीकर) यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोरोनाच्या काळात पत्नीचेही दुर्दैवी निधन झाले. सध्या ते शेळ्या वळून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मानधनासाठी दोनवेळा जिल्हा परिषदेकडे फाईल दिल्या. परंतु, त्याचाही काही उपयोग झाला नसल्याची खंत कुंडलिक शेवाळे वळतीकर यांनी व्यक्त केली. एकंदरीत लोककलावंतांना राजाश्रय मिळत नसल्याचे आता उघड होत आहे.

तमाशा कलावंत कुंडलिक शेवाळे यांनी तब्बल 40 वर्षे विविध तमाशा फडांमध्ये सोंगाड्याचे काम करून प्रेक्षकांना अक्षरक्षः खळखळून हसवले. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर, संगीतरत्न दत्ता महाडिक (पुणेकर), मंगला बनसोडे-करवडीकर, दत्तोबा तांबे (शिरोलीकर) अशा नामवंत तमाशा फडांमध्ये त्यांनी सोंगाड्याचे काम केले. अनेक वगनाट्यांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. परंतु गेल्या चार-पाच वर्षांमध्ये तमाशाचे स्वरूप बदलून गेले आहे. पारंपरिक तमाशाचे स्वरूप बदलून त्याला आता हिंदी-मराठी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचे स्वरूप आले आहे. त्यामुळे पारंपरिक तमाशात काम करणार्‍या अनेक तमाशा कलावंतांवर काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनानंतर स्वतःला सावरून पुन्हा तमाशात जाण्याचा प्रयत्न शेवाळे यांनी केला. परंतु तमाशात आता ङ्गसोंगाड्यांफफना कामच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. सलग दुसर्‍या वर्षी यात्रा हंगामात ते तमाशाच्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत. मध्यंतरी त्यांनी गोळ्या-बिस्किटे विकण्याचेदेखील काम केले. परंतु त्यातून त्यांचा खर्च भागत नव्हता. त्यामुळे ते कामही त्यांनी बंद केले. सद्यस्थितीत ते अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. मानधन मिळवण्यासाठी शासन दरबारी त्यांनी अनेकदा कागदपत्रे रंगवली. परंतु शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पुणे जिल्हा परिषदेकडे त्यांनी दोनवेळा मानधन मिळविण्यासाठी फाईल पाठविल्या. परंतु त्याचा अद्यापही विचार झाला नाही.

माझ्या आयुष्याचाच तमाशा झाला
तमाशा कलावंत कुंडलिक शेवाळे (वळतीकर) म्हणाले, तब्बल 40 वर्षे तमाशांमध्ये काम करून मायबाप रसिकांची सेवा केली. परंतु, कोरोना महामारीनंतर दिवसच पालटले. कोरोनाने माझ्या पत्नीलाही हिरावले. आता तमाशा फडमालक म्हणतात, तुम्हाला तमाशात काम नाही. आता एकाकी जीवन जगावे लागत आहे. नियतीनेही पाठ फिरवल्याने माझ्या आयुष्याचाच तमाशा झाल्याचे शेवाळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button