

भवानीनगर पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह श्री छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लांबल्याने राजकीय वातावरणात मरगळ निर्माण झाली आहे. निवडणुकांची वाट पाहून इच्छुक उमेदवार निराश झाले आहेत.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची मुदत संपून दीड वर्षे झाले आहेत. आगामी निवडणूक लढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील अनेक उमेदवार इच्छुक आहेत. परंतु निवडणुका लांबल्यामुळे या इच्छुकांमध्ये मरगळ आली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गट- गणांमध्ये राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. परंतु या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या कामाला ब्रेक लागला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकांना सुरुवात झाल्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्याही निवडणुका लवकरच जाहीर होतील, अशी चर्चा इच्छुक उमेदवारांमध्ये सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा या दोन पक्षांमध्ये होणार असली, तरी इतर राजकीय पक्षांना बरोबर घेऊनच या निवडणुका राष्ट्रवादी व भाजपला लढवाव्या लागणार आहेत
विधानसभेनंतर राजकीय वातावरण तापवण्यासाठी मोठी निवडणूक झालेली नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक प्रतीक्षेत असल्याने राजकीय वातावरणात कमालीची शांतता आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. श्री छत्रपती कारखाना निवडणुकीलाही मागील तीन वर्षांपासून मुदतवाढ दिली आहे.
श्री छत्रपती कारखान्याचे बारामती व इंदापूर या दोन तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे. दोन्ही तालुक्यांतील सभासदांमध्ये कारखान्याच्या निवडणुकीविषयी उत्सुकता आहे. श्री छत्रपती कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील गट गण ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती तालुक्यातील गट-गणांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मतदारांतही श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता लागलेली आहे.