पुण्यातील अनेक भागांत गुन्हेगारी वाढली; गावांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, सिंहगड रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंदच आहेत. ग्रामपंचायत काळात लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले हे कॅमेरे बंद असल्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
दुसरीकडे दाट लोकवस्तीच्या या भागात भुरट्या चोर्या, घरफोड्यांचा प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने दोन गटांत हाणामारी, प्राणघातक हल्ले, चोरी, अपघात अशा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिस यंत्रणेला अडथळे येत आहेत.. सर्वांत गंभीर स्थिती पर्यटकांची वर्दळ असलेल्या खडकवासला येथे आहे. धरणाच्या चौपाटीवर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. पर्यटकांचा धरणात बुडून मृत्यू , आत्महत्या अशा घटना वाढल्या आहेत.
गावातून जाणार्या मुख्य सिंहगड, पुणे-पानशेत रस्त्यावर, तसेच मुख्य चौकात ग्रामपंचायत काळात 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. कॅमेराची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत वेळच्या वेळी करीत असे, त्यामुळे पोलिस यंत्रणेसह नागरिकांना याचा फायदा होत होता. डिसेंबर 2021 मध्ये गावांचा पालिकेत समावेश झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही दिवसांतच सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली. दीड वर्षापासून खांबावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत पडले आहेत.
अशीच स्थिती किरटकटवाडी, नांदोशी, सिंहगड रोड, नांदेड परिसरात आहे. किरकटवाडी, नांदोशी रस्त्यावर वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक वाढली आहे. त्यात अवजड वाहनांमुळे अपघात वाढले आहेत. किरकटवाडी येथील शिवकालीन मंदिर फोडून चोरट्याने दानपेटी लंपास केली, तसेच लहान-मोठ्या चोर्या, घरफोड्यांचे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार या भागाच सुरू असताना कॅमेरे बंद असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
किरकटवाडी येथील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी खडकवासला मनसेचे उपाध्यक्ष रमेश करंजावणे व नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली. मात्र, अद्यापही कमेरे बंदच आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघ भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले म्हणाले, की नांदेड गाव व परिसरात साठ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. ग्रामपंचायत काळात गावठाणापासून नांदेड फाटा, जेपीनगर भागात शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. पालिकेकडे कारभार गेल्यापासून सर्व यंत्रणा बंद आहे.
समाविष्ट गावांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याबाबत विद्युत विभागाला सूचना दिल्या आहेत. समाविष्ट गावांतील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी करून तसा प्रस्तावही पाठवला आहे.
-प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय