बाजरीला आले सोन्याचे दिवस; उत्पादन कमी, मात्र मागणीत वाढ | पुढारी

बाजरीला आले सोन्याचे दिवस; उत्पादन कमी, मात्र मागणीत वाढ

श्रीकांत बोरावके

आळंदी : केंद्र सरकारकडून यंदा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे होत आहे. सरकारनेच पुढाकार घेतल्याने बाजरी पिकाला यंदा सोन्याचे दिवस आले आहेत. उत्पादन कमी असले, तरी मागणी वाढली आहे. परिणामी, कोरडवाहू शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.
पावसाळी बाजरीला मागणी असून, उन्हाळी बाजरीलाही चांगला भाव मिळण्याची चिन्हे आहेत.

मोठी मागणी असली, तरी त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. बाजरी पीक उत्पादनापासून लांब गेलेला शेतकरीआता पुन्हा बाजरीकडे वळला आहे. चिंबळी येथील प्रगतशील शेतकरी जय कड यांनी याबाबत सांगितले. माझी शेती कोरडवाहू आहे. बाजरी पीक आम्ही प्रामुख्याने घरी खाण्यासाठी व गावपातळीवर मागणीप्रमाणे विक्री करत असतो.

यंदा मात्र राष्ट्रीय पातळीवरच या पिकाला पुनर्जीवन मिळाल्याने आम्हीही व्यावसायिक उत्पादनाच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठी सुलभ बाजारपेठ व योग्य बाजारभाव किंवा हमीभाव मिळणे गरजेचे आहे, असे कड म्हणाले. एकंदरीतच उच्चभ्रू लोकांमध्ये कायम दुर्लक्षित राहिलेली भरडधान्य आणि प्रामुख्याने उच्च आहारमूल्य असलेली बाजरी पीक उत्पादन विषय ऐरणीवर आला आहे. यंदा त्याची मागणी झपाट्याने वाढेल असे चित्र आहे. शेतकरी बाजरीलाही व्यावसायिक पीक म्हणून पाहील यात शंका नाही.

Back to top button