आंबेगावातील थोरांदळेत महाप्रसादाची परंपरा आजही टिकून | पुढारी

आंबेगावातील थोरांदळेत महाप्रसादाची परंपरा आजही टिकून

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सवानिमित्त थोरांदळे येथे तब्बल 11 पोती गव्हाच्या तीन लाखांहून अधिक पुर्‍या, पाच पिंप गुळवणी, 700 किलो कांद्याची चटणी, असा महाप्रसाद तयार झाला आहे. पुर्‍या-गुळवणीच्या महाप्रसादाची परंपरा थोरांदळे ग्रामस्थांनी आजही टिकून ठेवली आहे. गुरुवारी हा महाप्रसाद भाविकांना देण्यात येणार आहे.

थोरांदळे येथे हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. ग्रामस्थ दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त पुर्‍या-गुळवणीचा महाप्रसाद भाविकांना वाटला जातो. ही परंपरा ग्रामस्थांनी आजही टिकून ठेवली आहे. महाप्रसादासाठी यंदा गावातील प्रत्येक घरांतून माणशी एक आठवा व उंबर्‍यामागे चार आठवे गहू गोळा केला.

तो 11 पोती गहू एकत्र करून पुन्हा घरोघरी वाटला. बुधवारी (दि. 5) सकाळपासून गावातील वाड्या-वस्त्या मळ्यांमधील महिलांनी गावात येऊन हनुमान मंदिरासमोरील ओट्यावर पुर्‍या लाटण्याचे काम सुरू केले. या महिलांनी तब्बल तीन लाखांहून अधिक पुर्‍या लाटल्या. गावातील तरुणांनी या पुर्‍या तळण्याचे काम केले. ज्येष्ठ नागरिकांनी चटणीचा कांदा चिरण्याचे काम केले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हा पुर्‍या-गुळवणीचा महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते.

गुरुवारी (दि. 6) पहाटे पाच ते सात ह.भ.प. नंदूमहाराज सोनवणे (रांजणी) यांचे हनुमानजन्माचे व काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर मांडव डहाळे व शेरणी मिरवणूक होऊन उपस्थित भाविकभक्त व पाहुण्यांना पुर्‍या- गुळवणीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकभक्तांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपर्‍यातून देखील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात, असे सरपंच जे. डी. टेमगिरे यांनी सांगितले.

Back to top button