हवेली बाजार समिती निवडणूक : आज लागणार हरकतींच्या सुनावणीचा निकाल | पुढारी

हवेली बाजार समिती निवडणूक : आज लागणार हरकतींच्या सुनावणीचा निकाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांवरील छाननी प्रक्रियेत व्यापारी-अडते आणि हमाल-मापाडी मतदारसंघासाठी आलेले सर्व अर्ज पात्र ठरले आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी दाखल चार उमेदवारांच्या अर्जावरील हरकतींचा निकाल आणि ग्रामपंचायत मतदारसंघाबाबतही सुनावणीचा निकाल राखीव ठेवला गेला. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत 18 जागांसाठी तब्बल 301 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज या अर्जांची छाननी झाली.

बाजार समिती निवडणुकीमध्ये व्यापारी-अडते मतदारसंघातील उमेदवारी अर्जावर एकही हरकत न आल्याने या गटातील सर्व अर्ज पात्र ठरले. हमाल-मापाडी मतदारसंघासाठी आलेली हरकत निकाली काढल्याने हरकत माघारी घेतली गेली. त्यामुळे या गटातीलही सर्व अर्ज पात्र ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. तसेच, ग्रामपंचायत गटासाठी एकही हरकत आली नव्हती. मात्र, या अर्जांमध्ये असलेल्या त्रुटीवर रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. सेवा सहकारी संस्था गटातील चार उमेदवारांच्या अर्जांवरील हरकतींचा निकाल आणि ग्रामपंचायत मतदारसंघाबाबतही सुनावणीचा निकाल उद्या (दि. 6) गुरुवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

या हरकतींमध्ये दिलीप काशिनाथ काळभोर, रोहिदास दामोदर उंद्रे, प्रकाश चंद्रकांत जगताप या उमेदवारांचे अर्ज आहेत. या वेळी संचालक मंडळ असलेल्यांवर 8 कोटी 66 लाख 50 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर चौकशीमध्ये या तीनही उमेदवारांवर ठपका ठेवला. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार पणन संचालकांचा आदेश कायम करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी 2022 ला पुन्हा फेरसुनावणीची प्रक्रिया सुरू केली व सर्व संचालकांना नोटिसा पाठविल्या आहेत. तत्कालीन संचालकांनी पणनमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील दाखल केले असून, त्यावर 12 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, या संचालकांविरोधात हरकती व सूचना आल्याने सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीचा निकाल राखून ठेवण्यात आला असून, तो गुरुवारी जाहीर केला जाणार आहे.

Back to top button