पुणे : उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी | पुढारी

पुणे : उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  उड्डाणपुलाच्या कामामुळे सिंहगड रस्त्यासह सनसिटी तसेच मुठा कालव्यालगतच्या रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वडगाव बुद्रुक-हिंगणे येथील मुठा कालव्याच्या तीरावरून जाणार्‍या रस्त्याची सध्या बिकट स्थिती झाली आहे. एकाच वेळी चारही बाजूंनी समोरून येणार्‍या वाहनांमुळे विश्रांतीनगर चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एकेरी वाहतुकीचे फलक लावले असले, त्याकडे काही वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत. सिग्नल नसल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे.

फन टाइम थिएटर ते मुठा कॅनॉल मार्गे ते विश्रांतीनगर, सिंहगड रस्ता ते तुकाईनगर रोड, जनता वसाहत, पु. ल. देशपांडे उद्यान ते विश्रांतीनगर, अशा चारही दिशेने वाहने विश्रांतीनगर चौकात येत आहेत. तसेच, उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने हायवे, तसेच नांदेड, धायरी, पानशेत, सिंहगडाकडे जाणारी वाहतूक या मार्गाला वळवली आहे. त्यामुळे कालवा रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला असून, वाहतूक कोंडी होत आहे. चौकात वाहतूक नियंत्रक व सिग्नल यंत्रणा उपाययोजना सुरू न केल्यास तीव— आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मुख्य रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच, एकेरी वाहतुकीचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे वाहनचालक दुर्लक्ष करीत असून, शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. विश्रांतीनगर चौकात वाहतूक वॉर्डन तैनात करण्यासह सिग्नल सुरू करण्याची सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
                 – प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

Back to top button