पुणे : डीपीसीतील सर्वसाधारण कामांसाठी 130 कोटींचा अतिरिक्त निधी

पुणे : डीपीसीतील सर्वसाधारण कामांसाठी 130 कोटींचा अतिरिक्त निधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजनाचा निधी चालू वर्षात 100 टक्के खर्च केला आहे. या निधीतून जिल्ह्यातील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेच्या विकास आराखड्यातील कामांसाठी गतवर्षापेक्षा 130 कोटींची वाढ मिळाली आहे. आता हा आराखडा 1 हजार 5 कोटी रुपयांचा झाला आहे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह शिक्षण आणि पर्यटनावर लक्ष देण्यात आले.

ग्रामीण रस्त्यांसाठी 93 कोटी रुपये खर्च होणार असून, याद्वारे 200 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांची निर्मिती होणार आहे. त्यासोबतच 41 कोटी 52 लाख रुपये खर्चाच्या 100 किलोमीटर इतर जिल्हा मार्गाचेही नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकरिता 236 कोटींपेक्षा अधिकचा निधी हा ग्रामपंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी सुधारणा, घाट सुधारणा, गटार बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम आदी कामांकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी 17 नगरपालिका/ नगरपंचायतींना 100 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळाव्यात, यादृष्टीने जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकरिता 36 कोटी 50 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेतील संगणक प्रयोगशाळा, डिजिटल टीचिंग डिव्हाइस, डिजिटल क्लासरूमसाठी 4 कोटी 50 लाखांचा निधी देण्यात आला आहे. महानगर पालिका क्षेत्रातील शाळांकरिता देखील प्रत्येकी 4 कोटी 50 लाख रुपये स्ट्रॉनॉमी लॅब व सायन्स लॅबकरिता देण्यात आले आहेत.

100 टक्के निधी वितरित
जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत प्राप्त 100 टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 875 कोटी रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) साठी 128 कोटी 98 लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम) साठी प्राप्त 54 कोटी 10 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news