‘गीतरामायणा’च्या शब्द-सुरांनी इतिहास घडविला, त्याची साक्षीदार बनले ! ग. दि. मांच्या स्नूषा शीतल माडगूळकर यांची भावना

‘गीतरामायणा’च्या शब्द-सुरांनी इतिहास घडविला, त्याची साक्षीदार बनले ! ग. दि. मांच्या स्नूषा शीतल माडगूळकर यांची भावना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'गीतरामायणा'चा अविरतपणे प्रवास सुरू आहे, हे पाहून मी खूप भारावून जाते. ही गदिमा आणि बाबूजींची पुण्याई आहे. 'गीतरामायणा'च्या शब्द-सुरांनी इतिहास घडविला, त्याची साक्षीदार मी बनले, याचा अभिमान आहे. 'गीतरामायण' ही अजरामर कलाकृती असून, ती एकमेवाद्वितीय आहे. अशी कलाकृती पुन्हा होणे नाही, त्यामुळे येत्या गुरुवारी होणारा 'गीतरामायणा'चा कार्यक्रम रसिकांनी अनुभवायला यावे, अशी भावना महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्नूषा शीतल माडगूळकर यांनी व्यक्त केली.

दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत, सहप्रायोजक गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज आणि त्रिमूर्ती आयुर्वेदालय यांच्या सहकार्याने आयोजित 'गीतरामायण' हा नयनमनोहर नृत्यांसह बहारदार कार्यक्रम गुरुवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला आहे. श्री रामभक्त हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. कार्यक्रमानिमित्त शीतल माडगूळकर आणि गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांच्याशी संवाद साधला.

शीतल माडगूळकर म्हणाल्या की, 1974 साली माझे श्रीधर माडगूळकर यांच्याशी लग्न झाले आणि माडगूळकर घराण्यात मी सून म्हणून आले. गदिमांचा सहवास मला अडीच वर्षे लाभला. या प्रवासात मला त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळाले आणि 'गीतरामायणा'शी असलेला बंध खर्‍या अर्थाने जुळून आला. तसा माझा 'गीतरामायणा'शी आणि गदिमांच्या काव्याशी लहानपणीच बंध जुळला होता. माझे माहेरचे आरेकर कुटुंबीय गदिमांचे चाहते होते. पहिल्यांदा कर्जतच्या घरी जमलेल्या मैफलीत माझ्या प्रभा आत्याने 'गीतरामायणा'तील गीत सादर केले आणि त्या सुंदर चंद्रप्रकाशात 'गीतरामायणा'चे शब्द मनाला भिडले, हृदयाला स्पर्शून गेले अन् आजही ते मनात रुंजी घालतात. गदिमांचे काव्य ऐकत मी लहानाची मोठी झाले.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत

मला कधीही वाटले नव्हते, की मी गदिमांची सून होईन. पहिल्यांदा 'गीतरामायण' ऐकल्यानंतर त्यानंतर सर्वच कार्यक्रमांना मी जायचे. आजही 'गीतरामायणा'च्या कार्यक्रमात रसिकांची दाद पाहून मी खूप भारावून जाते. लोकांच्या मनात 'गीतरामायण' ही कलाकृती खोलवर रुजलेली आहे. तेव्हा सुरू झालेला प्रवास आताही सुरू आहे. रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव आणि हीरक महोत्सवाच्या कार्यक्रमांना रसिकांची मिळालेली दाद आम्ही अनुभवली आहे. अशा अनेक आठवणी आहेत, ज्या मनात रुजलेल्या आहेत. कारण, 'गीतरामायणा'ने प्रत्येक पिढीला खूपकाही दिले आहे. 'गीतरामायणा' सारखी कलाकृती पुन्हा होणे नाही.

सहप्रायोजक गंगोत्री होम्स अ‍ॅण्ड हॉलिडेज्

गदिमा आणि बाबूजींच्या रूपाने श्री रामांचा आशीर्वाद मिळाला आहे. सुमित्र माडगूळकर म्हणाले की, मराठी भावगीताचे अत्युच्च शिखर म्हणजे अर्थातच 'गीतरामायण'! मराठी माणसांच्या मनात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात, तेथे 'गीतरामायणा'ने आपले स्थान मिळविले आहे. 'गीतरामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला. 1 एप्रिल 1955 रोजी पुणे आकाशवाणी या त्या वेळच्या सर्वांत प्रगत माध्यमातून 'गीतरामायणा'चे प्रसारण झाले. प्रसारणाच्या काळात रस्ते सुनसान होणे, रेडिओला हार घातले जाणे, उदबत्त्या ओवाळणे, असे चमत्कार होत असत. 'गीतरामायणा'चा गेल्या 68 वर्षांचा आढावा घेतला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते व ती म्हणजे 'गीतरामायणा'चा हा प्रवास टेकसॅव्ही प्रवास आहे. 'गीतरामायण' हे एकमेव महाकाव्य असावे, ज्याचे प्रसारण त्या वेळच्या आकाशवाणी ते आजच्या सर्वांत प्रगत मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध झाले आहे.

सर्वच माध्यमांत 'गीतरामायणा'ने प्रवास केलेला आहे. 'गीतरामायण' हे कालातीत आहे व त्यामुळेच नवीन पिढीलाही ते तितकेच आवडते आहे. अनेक लहान मुलांचे 'गीतरामायणा'चे कार्यक्रम आता होतात. अगदी इंग्रजी माध्यमात जाणारी मुलेही आज 'गीतरामायण' आवडीने सादर करतात. अशा अनेक पिढ्या जातील; पण 'गीतरामायण' हे हनुमंताप्रमाणे चिरंजीवी राहील.
                                                          – सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू

सहप्रायोजक त्रिमूर्ति आयुर्वेदालय  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news