नामांकित ब्रँडच्या नावाखाली विक्री ; कॉपीराइट अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल | पुढारी

नामांकित ब्रँडच्या नावाखाली विक्री ; कॉपीराइट अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नामांकित ब्रँडचा लोगो वापरून शहर परिसरातील विक्रेत्यांकडून डुप्लिकेट कपडे, शूज याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने वाघोली भागातील दोन दुकानांवर कारवाई करून तब्बल 8 लाख 92 हजारांचे कपडे, शूज, ट्रॅक पँट असा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही दुकानांमध्ये नामांकित कंपनीचा लोगो वापरून बनावट वस्तू विकल्याप्रकरणी कॉपीराइट कायद्यांतर्गत लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय राममूर्ती नरवडे (शिरूर), गणेश परशुराम जगताप (वय 31, रा. चौफुला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील नरवडे यांचे वाघोली परिसरात साई ब्रँड होम नावाचे दुकान असून, येथून पोलिसांनी 107 ट्रॅक पँट, 104 जॅकेट, 204 टी-शर्ट असा तब्बल 4 लाख 5 हजारांचा मुद्देमाल, तर जगताप यांच्या मोरया फॅशन या दुकानातून 105 ट्रॅक पँट, जॅकेट, 103 टी-शर्ट, 76 शूज असा तब्बल 4 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांवर कॉपीराइट अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहनसिंग देवरा (वय 36, रा. हरियाणा) यांनी फिर्याद दिली.

अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 6 चे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकातील उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार रमेश मेमाणे, नितीन धाडगे, हृषीकेश ताकवणे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button