पुणे : सारसबाग फूड, वॉकिंग प्लाझाला मान्यता | पुढारी

पुणे : सारसबाग फूड, वॉकिंग प्लाझाला मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या भवन विभागाच्या माध्यमातून सारसबाग चौपाटीचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी फूड आणि वॉकिंग प्लाझा विकसित करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या पूर्वगणन समितीने (एस्टिमेट) मान्यता दिली असून, यासाठी 8 कोटी 73 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, महापालिकेच्या अंदाजपत्रकात यासाठी साडेसात कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ऐतिहासिक सारसबाग पुण्याबाहेरील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथील खाद्यपदार्थांची चौपाटी बागेत येणार्‍या आबालवृद्धांसह अस्सल खवय्यांना कायमच खुणावते.

त्यामुळे या परिसरात पार्किंग आणि अतिक्रमणांचा प्रश्न वारंवार उद्भवतो. दुसरीकडे व्यावसायिकांनी महापालिकेची परवानगी न घेताच दुकाने दुमजली केली आहेत. त्यामुळे येथील स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनेकवेळा कारवाई केली जाते. या कारवाईत स्टॉलसमोरील शेड, टेबल, खुर्च्या, शेगड्या, गॅस आणि साहित्य जप्त केले जाते. वारंवार होणारी अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी तसेच येथे भेट देणार्‍या पर्यटकांचीही सोय व्हावी, यासाठी महापालिकेने या ठिकाणी वॉकिंग प्लाझा आणि फूड झोन केला जाणार आहे. स्टॉल्सची रचना आकर्षक आणि प्रत्येक स्टॉलपुढे मर्यादित टेबल-खुर्च्यांची सुविधा असेल.

जबाबदारी भवन विभागाकडे
महापालिकेच्या नवीन अंदाजपत्रकात सारसबाग फूड व वॉकिंग प्लाझासाठी भवन विभागाच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आठ ते दहा महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पूर्वगणन मान्यतेची रक्कम अधिक असल्याने यासाठी वर्गीकरण करावे लागण्याचीही शक्यता आहे.

Back to top button