निरेतील पाण्यात माशांची तडफड सुरूच | पुढारी

निरेतील पाण्यात माशांची तडफड सुरूच

बारामती : तालुक्यातील होळ येथे निरा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीतील लाखो माशांची जीव वाचविण्यासाठी तडफड सुरू आहे. पश्चिम बाजूला नदीमध्ये स्वच्छ पाणी असल्याने तिकडे मासे धाव घेत आहेत. परंतु, दूषित पाण्याने माशांचा मोठ्या प्रमाणावर जीव जात असून, नदीलगत मृत माशांचा खच पडू लागला आहे. निरेच्या प्रदूषणाबाबत सगळेच कारखाने, कंपन्या कानावर हात ठेवत असल्याने या प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

होळ येथे निरा नदीचे दृश्य पाहिले, तर एकीकडे स्वच्छ पाणी, तर दुसरीकडे कमालीचे दूषित पाणी, असा विरोधाभास दिसून येत आहे. होळच्या बंधार्‍याच्या वरील बाजूस मुरमाचा बंधारा आहे. तिकडील पाणी स्वच्छ तर होळ, कोर्‍हाळे खुर्द बाजूकडील पाणी कमालीचे अस्वच्छ व दूषित आहे. या भागाचा खालचा भाग म्हणजे कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज हा आहे. या भागातील दूषित पाण्याबाबत कायम फलटण तालुक्यातील कत्तलखाने, दूध कंपन्यांकडे बोट दाखविले जाते. परंतु, आता वरच्या भागातील होळ परिसरातील या स्थितीला नेमके कोणती कंपनी, कारखाने जबाबदार आहेत, असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित
करीत आहेत.

दोन्ही तालुक्यांत मासे खाण्याची स्पर्धा
निरा नदीच्या पाण्यावर तरंगणारे मासे मोठ्या प्रमाणात रविवारी व सोमवारी नागरिकांना मिळाले. फलटण तालुक्यात सुमारे दोन ते तीन टन मासे रिचवले गेले. बारामती तालुक्यातही मोठ्या प्रमाणात येथील मासे पकडून त्याची विक्री करण्यात आली. या माशांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने मासे पकडणार्‍यांची चंगळ झाली आहे. निरेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर माशांचा खच पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Back to top button