आंबेगाव तालुक्यात झेंडू फुलांच्या उत्पादन, भावातही घट | पुढारी

आंबेगाव तालुक्यात झेंडू फुलांच्या उत्पादन, भावातही घट

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : यंदा झेंडू उत्पादकांना दुहेरी फटका बसला आहे. गळीत कमी त्यात बाजारभावही कमी मिळत आहे. परिणामी, हंगाम तोट्यात गेल्याने झेंडू उत्पादक नाराज झाला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात अनेक शेतकरी उन्हाळी हंगामात झेंडू घेतात. सध्या थोरांदळे, रांजणी, नागापूर, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये झेंडूच्या बागा बहरल्या आहेत.

सध्या यात्रा, लग्नसराईचा हंगाम एकाच वेळी सुरू झाला आहे. परंतु फुलांना समाधानकारक बाजारभाव मिळत नाही. किलोला तीस रुपये असा बाजारभाव आहे. झेंडू पिकासाठी महागडी रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, खते, औषधे, मजुरी, बांधणीसाठी मोठे भांडवल गुंतविले आहे. सध्या मिळणार्‍या बाजारभावात भांडवली खर्चही वसूल होत नाही. कोरोनानंतर सलग दुसर्‍या वर्षी फुलांना बाजारभावाची साथ मिळालीच नाही. त्यामुळे फूल उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

यात्रा, लग्नसराईचा हंगाम डोळ्यांसमोर ठेवून 30 गुंठ्यांत झेंडू लागवड केली. 3 रुपये रोपाप्रमाणे दहा हजार रोपांना 30 हजार रुपये खर्च झाले. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन केले. सध्या फुलांची तोडणी सुरू झाली आहे. किलोला 30 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. उन्हाळी हंगामात उत्पादन व वजनही घटते. अशातच बाजारभावही कमी असल्याने भांडवल वसूल होणार नाही.
                                      – संतोष वाबळे, झेंडू उत्पादक, थोरांदळे.

Back to top button