पुणेकरांनी अनुभवली कर्नाटकी शास्त्रीय संगीताची जादू | पुढारी

पुणेकरांनी अनुभवली कर्नाटकी शास्त्रीय संगीताची जादू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सप्तसुरांची उधळण, टाळांचा निनाद, तबला आणि पखवाज यांचा झंकार आणि साथीला रसिकांची उत्स्फूर्त दाद, अशा मंत्रमुग्ध करणार्‍या ताल आणि सुरांच्या मैफलीने कर्नाटक घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्यासह गायक आणि वादकांनी सद्गुरू श्री जंगली महाराज यांच्या चरणी आपली संगीतसेवा अर्पण केली.

सद्गुरू श्री जंगली महाराज यांच्या 133 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जंगली महाराज मंदिर उत्सवामध्ये पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी आपल्या अप्रतिम गायनाने रसिकांना कर्नाटक शास्त्रीय संगीताची जादू अनुभवायला लावली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.

पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी मारू विहार रागामध्ये ’तुम मोरी सुरज सैया’ ही बंदिश सादर करून मैफलीची बहारदार सुरुवात केली. ’तुम हो दाता विधाता श्याम रंग’, ’पिया बिन मेरा नयना बरसे’ अशा बंदिशी कौशल्यपूर्ण हरकती घेत सादर करून जयतीर्थ मेवुंडी यांनी मंत्रमुग्ध केले. अविनाश पाटील (तबला), शांतीभूषण देशपांडे (हार्मोनियम), उद्धव गोळी (पखवाज), शिवाजी डाके (टाळ) यांनी मैफलीला साथसंगत केली.

Back to top button