पुणे : नदी सुधार योजनेची कामे मार्गी लावा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : नदी सुधार योजनेची कामे मार्गी लावा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नदी सुधार योजनेंतर्गत महापालिकेकडून सुरू असलेल्या नदी सुशोभीकरण व जायका प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, युवराज देशमुख, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.

डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 127 द. ल. लिटर प्रतिदिन असून, प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला 4 कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे. ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीजखर्चात बचत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून, 2025 अखेरपर्यंत नदीत प्रक्रिया केलेले पाणीच सोडण्यात येईल. प्रकल्पातून तयार होणार्‍या पाण्याचा उद्योगासाठीही वापर करता येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

पाटील यांनी बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत नदीकाठ सुशोभीकरणाच्याही कामाची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम 11 टप्प्यांत केले जाणार असून, त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा ही कामे सुरू
आहेत. कामाचा प्रथमत: 300 मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Back to top button