हडपसर महापालिकेचे स्वागत, पण सुविधाही द्या | पुढारी

हडपसर महापालिकेचे स्वागत, पण सुविधाही द्या

प्रमोद गिरी/सुरेश मोरे

हडपसर/वानवडी : पुणे महापालिकेवर वाढत्या लोकसंख्येचा ताण आणि उपनगरांतील वाढत्या नागरिकरणामुळे हडपसर-हवेलीसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. राज्य सरकारने पूर्व हडपसर-वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत पुणे महापालिकेकडे अभिप्राय मागितला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय नेते व नागरिकांना काय वाटते याचा घेतलेला हा आढावा…

प्रवीण तुपे (अध्यक्ष, हडपसर भाजीपाला खरेदी-विक्री संघ) : पुणे शहराच्या पूर्वभागातील होळकरवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, दिवेघाट, मांजरी, फुरसुंगी, उरुळी कांचन, उरुळी देवाची, लोणी काळभोरचा समावेश करून ‘ब’दर्जाची हडपसर महापालिका स्थापन करावी. मुंबई महापालिकेचे विभाजन करून नवी मुंबई महापालिका स्थापन केली आहे. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेचे विभाजन करून हडपसर महापालिका करावी.

अमोल हरपळे (माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य) : फुरसंगी व उरुळी देवाची नगरपरिषदेमुळे आमचा विकास होणार नाही. यामुळे राज्य सरकारने याबाबतचा घेतलेला निर्णय आधी बदलावा आणि आमची दोन्ही गावे पुणे महापालिकेतच राहू द्यावी. जेव्हा हडपसर व हवेलीसाठी स्वतंत्र महापालिका होईल, तेव्हा त्यात या गावांचाही समावेश करावा.

सचिन घुले-पाटील (माजी उपसभापती, हवेली पंचायत समिती) : पूर्व हडपसर-वाघोलीसाठी महापालिका झाली तर स्वागतच आहे. मात्र, याबाबत लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी गावे पुणे महापालिकेत समाविष्ट केलीत, त्यांना अजून पिण्याचे पाणी मिळत नाही. पूर्वभागासाठी नवीन महापालिका स्थापन करून या गावांचा त्यात समावेश केला, तर तेथील लोकांना एक तप तरी काही मिळेल असे वाटत नाही.

निवृत्ती बांदल (माजी सरपंच, उंड्री) : पूर्व हडपसर-वाघोली महापालिका झाली तर चांगलेच आहे. उंड्रीचा महापालिकेत समावेश केला असला, तरी विकास झाला नाही. नागरिकांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. नवीन महापालिका स्थापन करण्यापूर्वी जनतेला विश्वासात घ्यायला हवे. त्यानंतर याबाबतचा निर्णय होेणे गरजेचे आहे.

फारुक इनामदार (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सय्यदनगर) : पूर्व हडपसर-वाघोली महापालिकेला आमचा विरोध आहे. हडपसर हे पुणे महापालिकेतच असायला हवे. नवीन महापालिकेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या जनतेला मूलभूत सोयीसुविधा देणे शक्य होणार नाही.

शिवराज घुले (मांजरी बुद्रुक) : पूर्व हडसर भागासाठी नवीन महापालिका स्थापन करण्यात येऊ नये. कारण ही महापालिका स्थापन झाली, तरी तिला ‘क’अथवा ‘ड’ दर्जा मिळेल.

विक्रम शेवाळे (शेवाळेवाडी) : फुरसंगी, उरुळी देवाची नगरपालिकेबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि पूर्व हडपसर भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी.

पुणे महापालिकेने हडपसर पूर्वभागाला कायम दुय्यम दर्जा दिला आहे. या ठिकाणी कचरा डेपो व पाणीपुरवठ्याचेदेखील योग्य नियोजन करण्यात आले नाही. या भागातून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिका गोळा करते. त्या तुलनेत सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. यामुळे हडपसरसाठी स्वतंत्र महापालिका होणे गरजेचे असून, याबाबत सातत्याने विधानसभेतही मागणी केली आहे.

                         -चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा मतदारसंघ

महापालिकेत समाविष्ट केलेली 11 गावे आणि आणि हवेलीतील उर्वरित भाग एकत्र करून नवीन महापालिका स्थापन केली, तर तो निर्णय सगळ्यांच्या हिताचा ठरेल. फुरसंगी, देवाची उरुळी, उरुळी कांचन, वडकी, वाघोली, केसनंद, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, लोणीकंद, उंड्री. पिसोळी, वडाची वाडी, औताड वाडी, हांडेवाडी या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास परिसराचा सुनियोजित विकास होऊ शकेल.

                                                   -बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री

पूर्व हडपसर-वाघोलीसाठी स्वतंत्र महापालिका होणार असेल, तर तिचे स्वागतच आहे. मात्र, 1952 साली पुणे महापालिकेची स्थापना झाली, त्यावेळची जुनी हद्द कायम ठेवावी आणि पूर्वभागातील या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा नव्या महापालिकेत समावेश व्हावा. जेणेकरून त्या गावांचा परिपूर्ण विकास होईल. कारण महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत.

                                       -साहिल केदारी, उपाध्यक्ष,
                          महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल

Back to top button