पुणे : पालक-विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वर्ग | पुढारी

पुणे : पालक-विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वर्ग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी व पालकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 6 एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांसाठीच्या मार्गदर्शनाचा पहिला अभिनव प्रयोग असेल, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिली.

विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. काळे बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र शिंगणापूरकर, अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संजीव सोनवणे म्हणाले की, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही सर्वसमावेशक पद्धतीने प्रत्येक घटकाची बाजू, म्हणणे लक्षात घेऊन करण्यात यावी, या उद्देशाने हा अभिनव प्रयोग विद्यापीठ करीत आहे. रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले, 6 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व आयसीटी, मुंबई येथील प्राध्यापक डॉ. आर. डी. कुलकर्णी तसेच जळगावच्या एम. जे. महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. अनिल राव आदी मान्यवर या वेळी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • विद्यापीठाचा 6 एप्रिल रोजी अभिनव उपक्रम
  • मान्यवरांकडून शिक्षण धोरण समजावून घेण्याची संधी

Back to top button