शिखर शिंगणापूरमध्ये ‘हर हर महादेव’चा जयघोष | पुढारी

शिखर शिंगणापूरमध्ये ‘हर हर महादेव’चा जयघोष

सासवड; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरमधील यात्रेसाठी सासवड (ता.पुरंदर) येथील संत तेल्या-भुत्याच्या कावडीसह राज्यभरातून शेकडो कावडी आल्या होत्या. शिवभक्तही हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. ’हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर निनादून गेला होता. संत तेल्या-भुत्या कावडीने श्री रामनवमीला सासवडमधून प्रस्थान केले. उन्हाचा तडाखा सहन करीत उत्साहात प्रवास सुरू होता. ठिकठिकाणी कावडीचे गुलाल, पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.

रविवारी (दि.2) दुपारी 4 वाजता मुंगी घाट पायथ्याशी कावडीची महापूजा करून पहिली महाआरती झाली. मानवी साखळीच्या साहाय्याने मुंगी घाट सर करण्यास प्रारंभ केला. हजारो शिवभक्त हर हर महादेवच्या घोषणा देत होते. सायंकाळी 7.30 दरम्यान संपूर्ण घाट चढून कावड मंदिराच्या आवारात पोहोचली. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत, महापूजा झाली.

राज्यातील शेकडो कावडींनी अवघड मुंगी घाट सर करताना संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. मंदिर प्रदक्षिणेनंतर महाआरती झाली. कावडीचे महाराज कैलास कावडे यांच्या उपवासाची सांगता करून भाविकांना महाप्रसाद झाला. रात्री 12 वाजता शिवलिंगाला क-हेच्या पाण्याने जलाभिषेक झाला. वाद्यांचा गजर आणि रंगांची उधळण करत वारीची सांगता झाली.

Back to top button