पुणे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन मूल्यांकन | पुढारी

पुणे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन मूल्यांकन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येत्या सत्र परीक्षेचा निकाल लवकर जाहीर व्हावा, यासाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून त्या प्राध्यापकांना संगणक किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर ऑनलाइन पद्धतीने तपासता येणार आहेत.

पुणे विद्यापीठाने आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. कारभारी काळे आणि प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष अजूनही सुरळीत झालेले नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून महिन्यापासून करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष सुरळीत होणे गरजेचे असून, त्यासाठी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनस्क्रीन करून निकाल जलदगतीने जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करून आगामी 2023-24 शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ऑनस्क्रीन मूल्यमापनामुळे लवकर निकाल
विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा 6 जूनपासून सुरू होणार आहेत. अभ्यासक्रमाच्या विषयाचा पेपर झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. हे स्कॅनिंग पूर्ण झाल्यावर संबंधित उत्तरपत्रिका प्राध्यापकाच्या लॉगिनवर पाठविण्यात येईल. प्राध्यापकाने त्याला दिलेल्या लॉगिन आयडीचा वापर करून तो ऑनस्क्रीन तपासायचा आहे.

पेपर तपासून झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने त्याच्या एकूण गुणांची माहिती उपलब्ध होईल. ही माहिती त्याचवेळी पुन्हा विद्यापीठाकडे परत येईल. त्यानंतर विद्यापीठाकडून गुणपत्रिकांची छपाई करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शेवटच्या विषयाची परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत निकाल प्रसिद्ध होईल, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

Back to top button