हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील नऊ उद्योजकांवर ‘ईडी’चे छापे | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील नऊ उद्योजकांवर ‘ईडी’चे छापे

पुणे, पुढारी वृत्तसेवा : मनी लाँडरिंगच्या आरोपावरून चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या व भागीदार असलेल्या व्यक्तींच्या घरावर सोमवारी सकाळी पुण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. यात सॅलिसबरी पार्क, गणेश पेठ, नवी पेठ, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण नऊ ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते म्हणून ओळखले जाणारे मुश्रीफ यांचे कोणत्या व्यावसायिकांशी कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत व त्याविषयीची काही कागदपत्रे हाती लागतात काय, याची तपासणी करण्यासाठी ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चंद्रकांत गायकवाड हे अप्रत्यक्षरीत्या मुश्रीफ यांच्यासाठीच काम करीत असून, मुश्रीफ यांनी त्यांचा पैसा गायकवाड यांच्या व्यवसायात लावल्याचा संशय ईडीला आहे. याच कारणावरून त्यांच्या घरी व कार्यालयात यापूर्वीही म्हणजे जानेवारीमध्ये ‘ईडी’ने छापे टाकले होते. मात्र त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाला यश आले नाही. या वेळी ठोस पुराव्याच्या आधारे ‘ईडी’ने सोमवारी भल्या पहाटे गायकवाड यांच्यासह मुश्रीफ यांच्या संपर्कातील व्यावसायिकांचे घर व ऑफिसवर छापेमारी केली.

मुश्रीफ यांची मागील वर्षभरापासून सीबीआय व ‘ईडी’कडून वारंवार चौकशी केली जात आहे. असे असले तरी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना अटक करण्यापासून दिलासा दिला होता.

पुण्यातील या ठिकाणी छापेमारी

सॅलिसबरी पार्क, गणेश पेठ, नवी पेठ, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स फसवणूकप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत 108 जणांनी तक्रारी केल्या आहेत. ‘ईडी’च्या मुंबईतील पथकाने सोमवारी सकाळी व्यावसायिक विवेक गव्हाणे, सनदी लेखापाल जयेश दुधडिया आणि ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांचे कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. सोमवारी केलेल्या कारवाईत काही कागदपत्रे सापडली असून, त्याचा पंचनामा करून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button