‘स्टार्टअप’मध्ये पुणे देशात भारी! गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पसंती | पुढारी

‘स्टार्टअप’मध्ये पुणे देशात भारी! गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पसंती

दिनेश गुप्ता

पुणे : जागतिक स्पर्धेच्या युगात व मंदीतही स्टार्टअपमध्ये होणार्‍या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत असले, तरी पुण्यात मात्र स्टार्टअप मधील गुंतवणुकीने भरारी घेतल्याचे दिसून येत आहे. 2021 च्या तुलनेत सरत्या वर्षात पुण्यातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक वाढली आहे. पुण्याच्या तुलनेत सरस असणार्‍या बंगळुरू, दिल्ली आणि मुंबई या तिन्ही शहरांकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे.

देशातील स्टार्टअप गुंतवणुकीसंदर्भात ‘पीडब्ल्यूसी’ या जागतिक कंपनीकडून एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात पुणे व चेन्नई या शहरांमध्ये स्टार्टअपमध्ये गुंतवणूक वाढल्याचे नमूद केले आहे. देशात 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय ‘स्टार्ट अप डे’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर स्टार्टअपमधील पुण्याची कामगिरी समाधानकारक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले. स्टार्टअपमध्ये गेल्या चार वर्षांत बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली असून, पुणे चौथ्या क्रमांकावर होते. 2021-22 च्या अहवालानुसार पुणे स्टार्टअपचे हब बनत चालले आहे. स्टार्टअपसाठी पुण्यातील उद्योजकांनी केलेली नोंदणी पाहता, पुणे हे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते. पुढील दोन वर्षांत पुण्यात ऑटोमोबाइल्स, फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक या संदर्भातील अनेक नवीन स्टार्टअप उभे राहतील.

पुण्यात 2.73 कोटी डॉलर्सची वाढ

स्टार्टअपमधील 2022 मधील गुंतवणुकीचा अहवाल पाहिल्यास, बंगळुरूमध्ये 113.34 कोटी डॉलर, मुंबई आणि दिल्लीमध्ये 33.32 कोटी डॉलर व 51.74 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. 2021 च्या तुलनेत बेंगळुरू, दिल्ली आणि मुंबई या तिन्ही शहरांधील गुंतवणुकीत जवळपास 35 ते 40 कोटींनी भर घातली. मात्र, पुणे व चेन्नईत वेगळी स्थिती असून, येथील गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. 2021 मध्ये पुण्यातील स्टार्टअपमध्ये 10.92 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. तीच गुंतवणूक 2022 मध्ये 13.65 कोटी डॉलरवर गेली आहे. जागतिक मंदी असूनही, गुंतवणूकदार भारतीय स्टार्ट-अप इकोसिस्टमबद्दल सकारात्मक आहेत.

स्टार्टअपमध्ये देशात पुण्याचा क्रमांक सर्वात वर आला आहे. स्टार्टअप उद्योजकांनी नोंदणी केलेली असून, त्यांचा आकडा मोजल्यास पुणे हे क्रमांक एकचे स्टार्टअप शहर म्हणून नावरूपास आले आहे. उद्योजकांचा असाच ओघ राहिल्यास पुणे देशासाठी मॉडेल ठरेल.
– राजेंद्र जगदाळे, संचालक, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क

आकडे काय सांगतात….
शहर                         सन 2021                        सन 2022
बंगळुरू                   165.48 कोटी                  113.34 कोटी
दिल्ली एनसीआर        89.44 कोटी                   51.74 कोटी
मुंबई                        63.52 कोटी                   33.32 कोटी
पुणे                          10.92 कोटी                  13.65 कोटी
चेन्नई                         9.63 कोटी                    2.47 कोटी
हैदराबाद                   3.22 कोटी                    4.21 कोटी

Back to top button