सातगाव पठार भागात विहिरींनी गाठले तळ | पुढारी

सातगाव पठार भागात विहिरींनी गाठले तळ

पेठ(ता.आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार  भागात तीव्र उन्हाच्या झळांनी कहर केला आहे. वाढत्या उष्णतेने विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. कूपनलिकांचीही पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. नागरिकांसह जनावरांना पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. माणसांप्रमाणे पाळीव जनावरांनाही पिण्यासाठी भरपूर पाणी लागत आहे. अतिउष्णतेने एका पाळीव प्राण्याला रोज किमान तीस ते पस्तीस लिटर पाणी लागत आहे. माणसांसह जनावरांना पुरले इतके पाणी विहिरी तसेच कुपनलिकांमध्ये उपलब्ध नाही.

परिणामी शेतक-यांसह ग्रामस्थांपुढील संकट वाढले आहे. शेतात सध्या हिरवे पीक नाही, चारा नाही. जनावरांना पिण्यासाठी जास्त पाणी लागत आहे. परसबाग, विविध झाडांना पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सातगाव पठार भागात पाऊस जरी पडला तरी हा भाग उंचावर असल्यामुळे पाणी साठून राहात नाही. विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वाड्या-वस्त्यांवर तर तीव्र पाणीटंचाई आहे.

मे महिन्यात टँकर लागणार
एप्रिल महिना कसातरी लोटेल पण मे महिन्यात विहिरी कोरड्या ठणठणीत पडलेल्या असतील. त्या वेळी टँकर सुरू करावे लागतील, असे आंबेगाव तालुका ठाकरे गटप्रमुख दिलीप पवळे यांनी सांगितले.

Back to top button