वाढत्या उन्हामुळे रस्ते ओस; बारामती तालुक्यातील नागरिक उन्हाने त्रस्त | पुढारी

वाढत्या उन्हामुळे रस्ते ओस; बारामती तालुक्यातील नागरिक उन्हाने त्रस्त

बारामती; पुढारी वृत्तसेवा : एप्रिलच्या सुरुवातीपासूनच बारामती तालुक्यात प्रचंड उन्हाने नागरिक हैराण आहेत. नेहमी वर्दळीचे असलेले रस्ते निर्मनुष्य होत आहेत. दुपारच्या सत्रात तर रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असल्याने उन्हापासून संरक्षणासाठी विविध उपाययोजना करत आहेत. नेहमी वर्दळ असणार्‍या निरा- बारामती रस्त्यावर सकाळी अकरानंतर शुकशुकाट होत आहे. कोरोना काळात रस्ते निर्मनुष्य झाले होते त्याच पध्दतीने दुपारच्या सत्रात रस्त्यावरील वाहतूक घटली आहे.

गाळप हंगाम संपल्याने सोमेश्वर व माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजूर गावाकडे गेले. परिणामी, रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. सर्वच शाळांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात असल्याने विद्यार्थीही दुपारी रस्त्यावर अथवा घराबाहेर नसतात. उन्हामुळे थंड पदार्थांची मागणी वाढली आहे. नेहमी गजबजलेले चौक सुने -सुने वाटत आहेत.

ऐन उन्हाळ्यात यात्रांचा हंगाम सुरू होत असल्याने यात्रांवरही उन्हाचा परिणाम जाणवणार आहे. नेहमी वर्दळीच्या निरा-बारामती राज्य मार्गावर वाहनांची संख्या तुरळक आहे. बागायतीपट्टाही उन्हाने होरपळून निघाला आहे. पुढील दोन महिने हा उन्हाळा माणसांसह वन्यप्राणी, जनावरांसाठीही अडचणीचा ठरणार आहे.

Back to top button