बावडा : फळबागा संरक्षणासाठी साड्यांचे आच्छादन! | पुढारी

बावडा : फळबागा संरक्षणासाठी साड्यांचे आच्छादन!

बावडा; पुढारी वृत्तसेवा : तीव्र उन्हापासून फळबागांच्या संरक्षणासाठी साड्यांचा आच्छादन म्हणून शेतकर्‍यांकडून वापर होत आहे. नेटच्या तुलनेत साड्या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. परिणामी, इंदापूर तालुक्यात साड्यांचा आच्छादनासाठी वापर वाढला आहे.
तीव्र सूर्यप्रकाशामुळे फळांना तडे जातात. तसेच फळांवर सनबर्नमुळे पिवळे डाग पडतात.

परिणामी फळांची गुणवत्ता घटून दर कमी मिळतो. फळबागधारकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे फळबागधारक सोलापूरहून अल्पदरात साड्या खरेदी करून फळबागांवर आच्छादन म्हणून वापरत आहेत, असे फळबागधारक भारत लाळगे (सराफवाडी) यांनी सांगितले.

सध्या डाळिंब, पेरू आदी फळांचे दर तेजीत आहेत. मात्र, तीव्र उन्हामुळे फळांचे वजन लवकर वाढत नाही, त्यामुळे डाळिंब, पेरू बागांवर साड्यांचा आच्छादन म्हणून वापर केल्याने फळांचे वजन वाढीस फायदा होऊन, वाढीव दरही मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

Back to top button