पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष 2023-24 हंगामाकरिता विकास सोसायट्यांमार्फत शेतकर्यांना विविध पिकांसाठीच्या अल्पमुदत पीककर्जवाटपाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे,त्यानुसार ऊस, द्राक्षे, केळी, ड्रॅगनफ्रूट, डाळिंब, अंजीर आदी फळांसह भुईमूग, कांदा, टोमॅटो, भात, बटाटा, रेशीम लागवडीसाठीच्या हेक्टरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांनाबी-बियाणे, खते, औषधे आदी निविष्ठांच्या खरेदीसाठी या वाढीचा उपयोग होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची बैठक होऊन त्यामध्ये समितीने चालू वर्षासाठीचे पीक कर्जदर संमत केले आहेत. नाबार्डसह सहकार विभागाचे अधिकारी आणि जिल्हा बँकेसह अन्य बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अंजीर फळासाठी प्रतिहेक्टरी पीक कर्ज मर्यादा 42 हजार रुपयांवरून थेट 1 लाख 25 हजार रुपये करण्यात आली आहे. कोरोना काळात अंजिरास वाढलेली मागणी, शेतकर्यांकडून वाढविले जात असलेले क्षेत्र आणि प्रक्रिया उद्योगातून अंजिराची वाढत असलेली उलाढाल ही संबंधित शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांच्या बैठकीत मांडली. त्यानुसार सुधारित कर्ज दरवाढ मंजूर करण्यात आल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले. ड्रॅगनफ्रूटच्या शेतीला चालना देण्यासाठीही पीक कर्जवाटपात समावेश करण्यात आला आहे.
पिकाचे नाव आणि त्यास चालू वर्षासाठी हेक्टरी मंजूर पीक कर्जदर पुढीलप्रमाणे (कंसात कर्जदरात केलेली वाढ नमूद केली आहे.) ः
ऊस ः आडसाली 1 लाख 60 हजार (20 हजार), पूर्व हंगामी 1 लाख 50 हजार (19 हजार), सुरू हंगाम 1 लाख 50 हजार (19 हजार), खोडवा 1 लाख 25 हजार (15 हजार). द्राक्षे 3 लाख 50 हजार (20 ते 25 हजार). केळी ः 1 लाख 35 हजार (35 हजार) टिश्युकल्चर 1 लाख 65 हजार (25 हजार), पेरू 1 लाख रुपये (14 हजार), अंजीर 1 लाख 25 हजार (83 हजार), डाळिंब 1 लाख 75 हजार (25 हजार), ड्रॅगनफ—ुट 1 लाख 40 हजार.भुईमूग ः जिरायत 45 हजार (5 हजार), बागायत 50 हजार (6 हजार). कांदा 1 लाख रुपये (20 हजार), टोमॅटो 1 लाख रुपये (20 हजार), भात ः संकरित 65 हजार (5 हजार), बटाटा 1 लाख (25 हजार), रेशीम-तुती लागवड 1 लाख 25 हजार (25 हजार).
जिल्हा बँकेला गतवर्षी 2022-23 मध्ये खरीप आणि रब्बी हंगाम मिळून 2 हजार 384 कोटी रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकेने तब्बल 2 हजार 400 कोटी रुपयांइतके म्हणजे शंभर टक्क्यांहून अधिक पीक कर्जवाटप जिल्ह्यात केले आहे. चालूवर्षी 2023-24 साठी सुमारे 2 हजार 520 कोटींइतके म्हणजे गतवर्षापेक्षा 136 कोटी रुपयांनी उद्दिष्ट वाढवून देण्यात आले असून शेतकर्यांच्या सहभागाने आम्ही ते यंदाही पूर्ण करू. नव्या आर्थिक वर्षातील पीक कर्जवाटपास लवकरच सुरुवात होत आहे.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.