पिंपरी : वाहनांच्या अटकावासाठीचे बोलार्ड कुचकामी | पुढारी

पिंपरी : वाहनांच्या अटकावासाठीचे बोलार्ड कुचकामी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अर्बन स्ट्रिट डिझाईन अंतर्गत रस्ते छोटे व पदपथ मोठे करण्यात येत आहेत. पदपथावर वाहने शिरू नये म्हणून काँक्रीटचे बोलार्ड (संरक्षक कठडे) लावले जात आहेत. मात्र, ती हलक्या दर्जाची असल्याने तुटत आहेत. त्यामुळे शहर सौदर्यास बाधा पोहोचत असून, केलेला लाखोंचा खर्च वाया जात आहे.

पालिकेच्या वतीने परदेशातील मेट्रो शहराप्रमाणे रस्ते व पदपथ तयार केले जात आहेत. तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळापासून अर्बन स्ट्रिट डिजाईनची संकल्पना शहरात राबविली जात आहे. त्यात मोठे रस्ते अरुंद करून पदपथ रुंद केले जात आहेत. त्यात सायकल ट्रॅकही विकसित केले जात आहेत. पदपथ व गतीरोधक आकर्षकरित्या बनविले जात आहेत. पदपथावर वाहने चढ नये म्हणून स्टिल, लोखंडी किंवा काँक्रीटचे बोलार्ड लावण्यात आले आहेत.

मात्र, हे काँक्रीटचे बोलार्ड कमकुवत व हलक्या दर्जाचे असल्याने ते काही दिवसांत तुटत आहेत. तसेच, चौकात किंवा वळणावर वळण घेताना जड वाहनांचा धक्का लागून ते बोलार्ड तुटत आहेत. शहरात अशा तुटलेल्या बोलार्डची संख्या वाढत आहे. चिंचवड, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी आदी परिसरात तुटलेल्या स्थितीतील बोलार्ड दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे शहर सौदर्यास बाधा पोहचत आहे. ही बोलार्ड हटवून चांगल्या दर्जाचे बोलार्ड योग्य ठिकाणी लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Back to top button