पिंपरी : तालेरा रुग्णालयात मिळणार मल्टीस्पेशालिटी सुविधा | पुढारी

पिंपरी : तालेरा रुग्णालयात मिळणार मल्टीस्पेशालिटी सुविधा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाची पाचमजली नवीन इमारत बांधून तयार झाली आहे. या रुग्णालयात महापालिकेकडून मल्टीस्पेशालिटी सुविधा दिल्या जाणार आहे. मात्र, या इमारतीतील विविध कामे शिल्लक आहेत. तसेच, येथील रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सामग्रीची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

महापलिकेने चिंचवडगाव येथे तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारली आहे. या रुग्णालय इमारतीसाठी 1 मार्च 2018 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. 58 हजार 476 चौरस फूट क्षेत्रात हे बांधकाम होत आहे. इमारतीचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. तर, नवीन रुग्णालय इमारतीत मल्टिस्पेशालिटी सुविधा देण्याचे नियोजन आहे.

काय सुविधा मिळणार ?
बाह्यरुग्ण विभाग, 12 तपासणी कक्ष, क्ष-किरण तपासणी, प्रशस्ती प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, 24 तास फार्मसीची सोय, आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, आपत्कालीन अतिदक्षता विभाग, पॅथॉलॉजी लॅब, फिजिओथेरपी, सिटी स्कॅन, डे-केअर वॉर्ड (7 खाटा), अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स – 4, डायलेसिस विभाग, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड (36 खाटा), सर्जिकल विभाग (36 खाटा), प्रशासन विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी कक्ष, कान-नाक-घसा व नेत्र विभाग (16 खाटा), अस्थिरोग विभाग (20 खाटा), सभागृह (आसन व्यवस्था – 100), पार्किंग प्रस्तावित – 67 चारचाकी आणि 85 दूरचाकी वाहनांसाठी सोय.

तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी केली. तसेच, कामकाजाचा आढावा घेतला. नवीन इमारतीत मल्टीस्पेशालिटी सुविधा सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

– डॉ. संगीता तिरुमणी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय

Back to top button