इंदापूर तालुक्यात जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून रस्ता | पुढारी

इंदापूर तालुक्यात जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून रस्ता

शेटफळगढे; पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरच परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते बनवले गेले. मात्र, इंदापूर, बारामती आणि दौंड या तीन तालुक्यांतून जाणार्‍या सुमारे 30 किलोमीटर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर सुरू आहे. त्यामधील खडकी ते निरगुडे हे 22 किलोमीटरचे काम देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी करीत आहे. हे काम जर्मन तंत्रज्ञानाच्या मशिनने सुरू असून, तालुक्यातील हे पहिलेच काम आहे.

या रस्त्याचे काम निरगुडे परिसरात जोरात चालू असून, या कामासाठी लागणार्‍या मशिनरी जर्मन टेक्नॉलॉजीच्या आहेत. या रस्त्यासाठी आशिया विकास बँकेचे अर्थसाह्य आहे. हा रस्ता पालखीमार्ग व पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या दोन रस्त्यांना जोडणारा रस्ता असून, या रस्त्यावर अनेक पाईपचे पूल आणि मोठे पूलदेखील केले जाणार आहेत. या रस्त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामधील 150 कोटींचे काम करण्यासाठी एक कंपनी, तर दुसरे 50 कोटींचे काम करण्यासाठी दुसरी कंपनी आहे.

या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम करताना तापमान अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची काळजी घेण्यासाठी पाण्यामध्ये बर्फ वापरण्यापर्यंतही काळजी घेतली जात आहे. त्याचबरोबर हे मशीन अतिशय तंत्रयुक्त पद्धतीने काम करीत आहे. परदेशी टेक्नॉलॉजीचा वापर करून होत असलेल्या रस्त्याचा मान या रस्त्याला मिळाला असून, या रस्त्याचे काम करणारी कंपनी ही याच तालुक्यातील असल्याने या रस्त्याची तालुक्यात चर्चा चालू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मधुकर सुर्वे, शाखा अभियंता डी. एम. चौरे यांच्या देखरेखीत सुरू आहे.

Back to top button