

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : उष्णतेचा पारा कमालीचा वाढला असून, एप्रिल व मे महिन्यांत तापमानात आणखी वाढीची शक्यता आहे. त्यामुळे शेतात, शेतातील वाड्यावर, घरात, अडचणीच्या जागेत विषारी साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी शेतात, घरासमोरील अंगणात झोपताना काळजी घेण्याची गरज आहे.
तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर गेला आहे. वातावरणातील उष्णतेचा परिणाम नागरिकांसह प्राण्यांवरही होत आहेत. उष्णतेमुळे साप बिळातून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढल्याने, सर्पदंशाचा धोका वाढला आहे. सध्या सापांचा मिलनकाळ असल्याने दोनपेक्षा जास्त सापही निदर्शनास येत आहेत. वाढत्या तापमानामुळे सापांची हालचाल वाढली आहे. यामुळे रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना शेतकर्यांनी व उन्हाळ्यातअंगणात झोपणार्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.
सर्पमित्रांशी संपर्क साधा
सर्वच साप विषारी नसतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, कोठेही साप दिसल्यास सापापासून लांब राहावे. नाग, मण्यार, पोवळ, घोणस, फुरसे हे साप विषारी असतात. साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.