भवानी पेठ : इफ्तार पार्टीसारख्या सामाजिक उपक्रमांची गरज

भवानी पेठ : इफ्तार पार्टीसारख्या सामाजिक उपक्रमांची गरज

भवानी पेठ; पुढारी वृत्तसेवा : 'सैन्यदलातील जवान आणि पोलिस कोणत्याही एका जाती-धर्माचे नसतात. जवानांकडून देशाच्या सीमेचे संरक्षण होते, तर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते. युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांचा सन्मान विविध जाती-धर्मांच्या सोहळ्यात होत असतो. यामुळे रोजा इफ्तार पार्टीसारख्या सामाजिक उपक्रमांची आज गरज आहे,' असे मत क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक व अध्यक्ष निवृत्त कर्नल वसंत बल्लेवार यांनी व्यक्त केले.

खडक पोलिस ठाणे आणि भोई प्रतिष्ठानकडून रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन पोलिस ठाण्यात केले होते, त्या वेळी कर्नल बल्लेवार बोलत होते. अपंगत्व आलेल्या जवानांचा या वेळी गौरव करण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे 27वे वर्ष होते. अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, फादर अनिल इनामदार, भंते संघबोधी, ग्यानी सरबजित सिंग, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी, मौलाना काजमी आदी या प्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी आभार मानले.

सध्याच्या परिस्थितीत समाजात जाती-धर्मांत तेढ निर्माण झाल्याने अशांतता आहे. अशा वेळी इफ्तार पार्टीसारखे सामाजिक उपक्रम राबवून समाजात चांगला संदेश दिला जात आहे.
                                      – संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news