पुणे : शेकडो शालेय विद्यार्थी बनले ग्रंथालयांचे सदस्य | पुढारी

पुणे : शेकडो शालेय विद्यार्थी बनले ग्रंथालयांचे सदस्य

सुवर्णा चव्हाण

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे शालेय विद्यार्थी ग्रंथालयांमध्ये जाऊन बाल पुस्तके वाचू लागली असून, काही विद्यार्थ्यांनी तर ग्रंथालयाचे कायमस्वरूपी सदस्यत्व घेतले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेली रहस्य कथांपासून ते विज्ञानावर आधारित बाल पुस्तके ते वाचत असून, ग्रंथालयांकडून विद्यार्थ्यांना खास बाल पुस्तक विभागही तयार करण्यात आला आहे. तर काही ग्रंथालयांनी तर संगणकावर ऑडिओ बुक, ई-बुक स्वरूपातही विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली असून, काही विद्यार्थी रोज ग्रंथालयात जाऊन बाल पुस्तके वाचण्यास प्राधान्य देत आहेत.

काही ग्रंथालयांचे 1 हजार बाल वाचक सदस्य आहेत तर काही ठिकाणी 700 वाचक सदस्य आहेत. पुस्तके ग्रंथालयात उभारलेल्या स्वतंत्र बाल पुस्तक कक्षात जाऊन विद्यार्थी वाचत असून, खासकरून पाचवी ते दहावीतील विद्यार्थी ग्रंथालयांमध्ये जाऊन पुस्तके वाचत आहेत. ग्रंथालयांकडूनही बाल वाचकांचे सदस्यत्व वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रविवारी (दि.2) साजरा होणार्‍या जागतिक बाल पुस्तक दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.

पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे म्हणाले, ग्रंथालयात आम्ही लहान मुलांसाठी मुक्तांगण हा बाल विभाग सुरू केला आहे. त्यात जवळपास 25 हजार लहान मुलांसाठीची पुस्तके आहेत. त्याठिकाणी संगणक आणि मुलांसाठी 500 पुस्तकांच्या सीडीज उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थी बालविभागात पुस्तके वाचण्यासाठी येतात. जवळपास 800 विद्यार्थी ग्रंथालयाचे सदस्य आहेत. गोष्टींच्या पुस्तकांसह रहस्यात्मक कथा, चरित्र पुस्तके, विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित पुस्तके विद्यार्थी जास्त वाचतात. त्यांना सदस्यत्वाचे ओळखपत्र दिले आहे. निरनिराळ्या भागांत विद्यार्थ्यांसाठी वासंतिक वाचनालयही घेत आहोत.

सिद्धार्थ वाचनालयाचे ग्रंथपाल दिलीप भिकुले म्हणाले, विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी आम्ही सदस्यत्व नोंदणी अभियान राबविले. जवळपास दीडशे विद्यार्थी ग्रंथालयात नियमितपणे वाचनासाठी येतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड असून, विविध विषयांवरील पुस्तके ते वाचनासाठी घरी नेतात.

Back to top button