मिरवणुकीसह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम; भगवान महावीर स्वामी यांची जयंती 4 एप्रिलला | पुढारी

मिरवणुकीसह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम; भगवान महावीर स्वामी यांची जयंती 4 एप्रिलला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा चैत्र शुद्ध त्रयोदशी 3 आणि 4 एप्रिलला असली, तरी भगवान महावीर स्वामी यांची जयंती पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारी (दि.4) साजरी करण्याचा निर्णय जैन समाजबांधवांनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी जयंती आनंदात, उत्साहात साजरी होणार असून, यानिमित्ताने खास तयारी करण्यात आली आहे. भव्य मिरवणुकांसह धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर यानिमित्ताने सामाजिक उपक्रमही राबविले जाणार आहेत.

श्री जैन सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचल जैन म्हणाले, तिथीनुसार भगवान महावीर यांची जयंती सोमवारी (दि.3) साजरी होणार असली, तरी यंदा दोन वेळा त्रयोदशी आल्या आहेत. त्यामुळे पहिली त्रयोदशी सोडून दुसर्‍या दिवशीच्या त्रयोदशीला जयंती साजरी होणार आहे. केंद्र सरकारकडूनही मंगळवारीच जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुण्यातही मंगळवारी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हीसुद्धा भव्य मिरवणुकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हजारो दिव्यांनी देवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. पुण्यात जवळपास 3 लाख बांधव वास्तव्यास आहेत. सर्वजण एकत्र येऊन जयंती साजरी करणार आहे.

आदिनाथ स्थानक भवनचे कार्याध्यक्ष अनिल नहार म्हणाले, पुण्यात जैन समाजबांधव मंगळवारी (दि.4) महावीर जयंती एकत्र येऊन साजरे करणार आहे. मंगळवारी जयंती साजरी करण्याचा निर्णय जैन बांधवांनी घेतला आहे. त्यानुसार तयारीही झाली असून, भव्य मिरवणुकांसह यानिमित्ताने विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. जैन धार्मिक स्थळांमध्येही धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे रेलचेल असणार आहे. पूजा-अर्चासह प्रवचन आणि काही सामाजिक उपक्रमही आयोजिले आहेत. तर जैन बांधव उपवासही करणार आहेत.

जैन उत्सव समितीतर्फे कार्यक्रम

श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने श्री तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजींचा जन्म कल्याणक महोत्सव (महावीर जयंती) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेलडा आणि नितीन जैन (खिंवसरा) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या जयंतीनिमित्त मंगळवारी( दि 4) सकाळी 7.15 वाजता भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक श्री गोडीची पार्श्वनाथ मंदिर, फुलवाला चौक येथून प्रारंभ होऊन बोहरी आळी, लक्ष्मी रोड, सोन्या मारुती चौक येथे येईल. तेथे सकाळी 8.15 ते 8.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते महावीरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शोभायात्रेचे स्वागत करतील. मिरवणूक पुढे श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर मुकुंदनगर, सुजय गार्डन, लक्ष्मी नारायण थिएटर चौक सातारा रोड, आदिनाथ स्थानक येथे समाप्त होईल.

सकाळी 11.45 वाजता गुरू भगवंतद्वारे, मांगलिक प्रवचन व देखाव्याचे पारितोषिक वितरण समारंभ आदिनाथ जैन स्थानक येथे होईल. दुचाकी अहिंसा रॅली सायंकाळी 4 वाजता श्री दादावाडी जैन मंदिर येथून सुरू होऊन जय जय जिनेन्द्र (नाजुश्री) गंगाधाम चौक येथे समाप्त होईल. सायंकाळी 7 ते 10 या वेळेत भक्तिगीत, लाईट, साऊंड, व्हिडिओ इफेक्ट, डान्स परफॉर्मन्स, नवकर मंत्राची धून, गरबा नृत्य, हजारोंच्या संख्येने दिव्यांची महाआरती, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Back to top button