पुणे : ऑटिस्टिक मुलांना गरज स्वावलंबित्वाची..!

पुणे : ऑटिस्टिक मुलांना गरज स्वावलंबित्वाची..!
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वमग्न मुलांमध्ये संवाद साधण्याचा अभाव आढळून येतो. अशा वेळी त्यांना समजून घेण्याची, प्रेमाची, आधाराची गरज असते. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांचे खच्चीकरण न करता त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. ऑटिस्टिक मुलांना व्यावसायिक शिक्षण घेण्यास उद्युक्त केल्याने त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. ग्रंथपाल, झेरॉक्स मशीन चालवणे, लॅमिनेशन, आटा चक्की घेऊन घरगुती गिरणी चालवणे अशा स्वरूपाची कामे करून मुले स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतात. त्यासाठी पालकांनी ऑटिस्टिक मुलांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल सजगतेने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.

बरेच पालक समाजाच्या दबावामुळे म्हणा किंवा स्पर्धेच्या युगात मुलांना किमान तग धरता यावा, यासाठी इंग्रजी शिकवण्यासाठी धडपड करतात. मुख्य प्रवाहाशी जुळवून घेताना आधीच मुलांची त्रेधातिरपीट होत असते. पालकांच्या दबावामुळे ऑटिस्टिक मुलांमधील आक्रमकता आणखी वाढू शकते. त्यामुळे पालकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असते, याकडे प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या साधना गोेडबोले यांनी लक्ष वेधले.

पालकांनी काय काळजी घ्यावी?
बरेच पालक मुलांच्या शैक्षणिक टप्प्यांबद्दल जास्त सजग असतात. त्यामुळे मुलांना अवघड जाईल अशा बोर्डच्या शाळेत टाकण्याचा अट्टाहास मुलांसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात मुलांना सामील होता यावे, यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. कोणत्याही दबावाला बळी न पडता मुलांच्या कलाने निर्णय घेणे अत्यंत गरजेचे असते.

ऑटिझमचे निदान कधी होते?
मुलांमध्ये जन्मापासून ऑटिझम असले तरी दीड-दोन वर्षांच्या दरम्यान त्याचे निदान होते. डोळ्यांत डोळे घालून न बघणे, समोरच्याच्या बोलण्यास प्रतिसाद न देणे, नावाने हाक मारल्यास लक्ष न देणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. बालरोगतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने मुलांवरील उपचारांना सुरुवात करता येते. मुलांना बिहेवियरल थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी असे उपचार दिले जातात.

पालकांनी मुलांना 'स्पेशल चाइल्ड' म्हणून वागवू नये. आपणच मुलांना वेगळ्या नजरेने पाहू लागलो तर जगाच्या नजराही सहानुभूतीने पाहू लागतात आणि त्याचा मुलांना जास्त त्रास होतो. मुलांबाबत जे झाले, त्यावर विचार करत बसल्याने परिस्थिती बदलणार नसते. त्यामुळे यापुढे काय मार्ग काढता येईल, मुलांचे जीवन सुसह्य करता येईल यादृष्टीने कृती महत्त्वाची असते.

                             साधना गोडबोले, व्यवस्थापकीय संचालक,
                                        प्रसन्न ऑटिझम सेंटर.

बाळाच्या जन्मानंतर वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. तपासणीमधून मानसिक दिव्यांगता, ऑटिझम यांसारखे निदान झाल्यास वैद्यकीय लक्ष देऊन त्वरित हाताळले जाऊ शकते. नवजात बालकांचे स्क्रिनिंग आजकाल परवडणा-या दरात उपलब्ध आहे. जन्मजात समस्या जाणून घेण्यासाठी स्क्रीनिंग केले जाते. त्यावर तातडीने उपचार करता येऊ शकतात.

                        डॉ. प्रेरणा अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news