पुणे : पीएमपीला 187 कोटींचा तोटा; पीएमआरडीए भागातील सेवेचा फटका | पुढारी

पुणे : पीएमपीला 187 कोटींचा तोटा; पीएमआरडीए भागातील सेवेचा फटका

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासनाची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए भागात बससेवा सुरू आहे. या सेवेमुळे पीएमपीला वार्षिक 187 कोटी 84 लाख 31 हजार 105 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर, रोजचा 51 लाखांपेक्षा अधिक तोटा येत आहे. मात्र, असे असले तरी पीएमपी या भागात आपली सेवा पुरवत आहे. त्यामुळे आगामी काळात पीएमआरडीए नक्कीच अर्थसाह्य करेल, अशी अपेक्षा पीएमपी प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2 हजार 142 बस आहेत. त्यापैकी 1100 ठेकेदारांच्या, तर 1 हजार स्वमालकीच्या आहेत. पुणे शहरालाच 3 हजार 500 बसची आवश्यकता आहे. मात्र, शहरासाठी बसचा तुटवडा असला, तरी पीएमपी प्रशासन पीएमआरडीए भागातील प्रवाशांकरिता बस उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा पुरविण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा पीएमपीकडून व्यक्त होत आहे.

पीएमपीला मिळणार बूस्टर
राज्य शासनाने पीएमआरडीएच्या आयुक्तांची पीएमपी संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला अर्थसाह्य मिळण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमआरडीएकडून आर्थिक साह्य मिळाल्यास पीएमपीला ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी मदत होणार असून, प्रवासीसेवेलाही बूस्टर मिळणार आहे.

24 टक्के सेवा पीएमआरडीए भागात
पीएमआरडीए भागातील मार्ग – 113
मार्गावर धावणार्‍या रोजच्या बस – 490
रोजच्या एकूण फेर्‍या – 4 हजार 918
पीएमआरडीए भागातील पीएमपीची उलाढाल
रोजची प्रवासीसंख्या
2 लाख 53 हजार 506
महिना प्रवासीसंख्या
78 लाख 58 हजार 677
रोजचे उत्पन्न
35 लाख 67 हजार 315
महिना उत्पन्न
11 कोटी 05 लाख 86 हजार 763
सेवा पुरविण्यासाठी येणारा रोजचा खर्च
1 कोटी 10 लाख 10 हजार 328

पुणेकरांना चांगली बससेवा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. आता पीएमआरडीए आयुक्त पीएमपीचे संचालक असणार आहेत. त्यांच्याकडूनही आम्हाला आर्थिक साह्य मिळणार आहे.

   ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button