…कथकद्वारे ’गीतरामायणा’ची पुणेकरांना येणार अनुभूती; सुनीला दातार-पोतदार यांची भावना | पुढारी

...कथकद्वारे ’गीतरामायणा’ची पुणेकरांना येणार अनुभूती; सुनीला दातार-पोतदार यांची भावना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कथक नृत्याद्वारे ‘गीतरामायणा’चे प्रतिबिंब उमटविण्यासाठी मी प्रयत्न सुरू केला अन् प्रत्यक्ष श्रीधर फडके यांच्यासोबत अयोध्येत झालेल्या सादरीकरणामुळे ते स्वप्न साकार झाले. मी स्वतःला भाग्यवान समजते. ‘गीतरामायण’ कथक नृत्यातून प्रत्यक्ष उलगडत असल्याची अनुभूती येत्या गुरुवारी पुण्यात रसिकप्रेक्षकांना येणार आहे. एकीकडे ‘गीतरामायणा’चे नृत्याभिनय, दुसरीकडे श्रीधर फडके यांचे सुरेल गायन आणि तिसरीकडे ‘गीतरामायणा’तील गीतांचा अर्थ कथक नृत्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे एकलव्य आर्ट फाउंडेशनच्या संस्थापिका आणि कथकविशारद सुनीला दातार-पोतदार यांनी सांगितले.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत आणि दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘गीतरामायण’ नयनमनोहर नृत्यांसह हा बहारदार कार्यक्रम गुरुवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला आहे. रामभक्त हनुमान यांच्या जयंतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असून, ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांच्या सुरेल गायनासह सुनीला दातार-पोतदार आणि सहकारीही कथक नृत्याद्वारे ‘गीतरामायण’ प्रत्यक्ष रसिकप्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत. त्यानिमित्त सुनीला दातार-पोतदार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही भावना व्यक्त केली.

वकिलीचे शिक्षण घेतलेल्या सुनीला ह्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे कथक नृत्याच्या क्षेत्रात आल्या. आज त्यांनी कथक नृत्याच्या क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले असून, त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरू आहे. त्या आणि त्यांचे सहकलाकार समृद्धी चव्हाण, अवनी पटवर्धन, श्रेणी सुुवारे, तनिष्का देशपांडे, सायली कोरडे, सानिका सोनगिरे, मंजिरी थत्ते, रश्मी परब, सिद्धी रणधीर, पवित्रा भट, ऋतुजा मोरे आणि वैशाली देशपांडे हे सादरीकरण करणार आहेत.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. प्रस्तुत आणि दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘गीतरामायण’ नयनमनोहर नृत्यांसह बहारदार कार्यक्रम

सुनीला म्हणाल्या, ‘एकलव्य आर्ट फाउंडेशन ही आमची कथक नृत्यावर आधारित संस्था आहे. त्यातून एक हजार कार्यक्रम आतापर्यंत आम्ही केले आहेत. विविध महोत्सवांसह कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी सादरीकरण केले असून, अनेक दिग्गजांबरोबर आम्ही काम करीत आहोत. श्रीधर फडके यांचा श्री रामनवमीला डोंबिवलीमध्ये ‘गीतरामायण’ कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी आयोजकांनी तुम्ही नृत्य सादर कराल का? हे विचारले. मी सादरीकरणासाठी होकार दिला आणि डोंबिवलीच्या कार्यक्रमात फडके यांनी आमचे ‘गीतरामायणा’वरील नृत्य पाहिले आणि अयोध्येत सादरीकरणाची संधी दिली.

ही संधी आमच्यासाठी सुवर्णसंधी ठरली आणि हा अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाही. कथकद्वारे ‘गीतरामायणा’तील चार गीते आम्ही सादर केली अन् प्रेक्षकांच्याही ते पसंतीस पडले. खूप दाद मिळाली.’ सादरीकरणाबद्दल सुनीला म्हणाल्या, ‘ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि भावगंधर्व सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी स्वरसाज चढविलेले ‘गीतरामायण’ कथक नृत्यातून प्रत्यक्ष उलगडत असल्याची अनुभूती नक्कीच रसिकप्रेक्षकांना होणार आहे.

आम्ही कार्यक्रमात रामजन्मला ग सखी…, स्वयंवर झाले सीतेचे…, जय गंगे जय भागीरथी…, सेतू बांधारे… आणि त्रिवार जयजयकार… ही गीते नृत्यात गुंफली आहेत. नृत्याभिनयातून प्रत्यक्षपणे आम्ही रामकथा मांडणार आहोत.’ सारसबागेजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार्‍या या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’तर्फे करण्यात आले आहे.

गीतरामायण नृत्यांसह सारसबागेजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे 6 एप्रिलच्या हनुमान जयंतीला सायंकाळी 6 वाजता.

Back to top button