नगरमधील भेसळयुक्त दुधाचे जुन्नर कनेक्शन | पुढारी

नगरमधील भेसळयुक्त दुधाचे जुन्नर कनेक्शन

बेल्हे : श्रीगोंदा पोलिसांनी भेसळयुक्त दूधप्रकरणी चौकशीसाठी जुन्नर तालुक्यातील आणे- माळशेज पट्ट्यातील गावांमधील अनेकांना ताब्यात घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील भेसळयुक्त दुधाचे कनेक्शन जुन्नर तालुक्यात काही गावांत पोहोचल्याने सध्या मिळत असलेले दूध निर्भेळ की भेसळयुक्त आहे, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे केमिकल व पावडर वापरून बनावट दूध तयार केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्य औषध प्रशासनाने छापा टाकून 10 जणांना अटक केली. याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपी अद्यापही पोलिसांना मिळाले नाहीत.

अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी फिर्याद दिल्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य संशयित बाळासाहेब पाचपुते पोलिसांना सापडलेले नसून, संदीप संभाजी मखरे, वैभव रामदास राऊत, दीपक विठ्ठल मखरे, नीलेश तुकाराम मखरे, संदीप बबन राऊत (सर्व रा. श्रीगोंदा), कैलास बाबाजी लाळगे (रा. शिरूर), वैभव जयप्रकाश हांडे (रा. उंब—ज, ता. जुन्नर), संजय तुकाराम मोहिते (पारगाव सुद्रिक), विशाल अशोक वागस्कर (सुरोडी), अनिल काशीनाथ कुदांडे (भानगाव) अशा 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील उंब्रज, ओतूर, आळे परिसरातील काही व्यक्तींना श्रीगोंदा पोलिसांनी गेल्या दोन ते तीन दिवसांत ताब्यात घेतले असून, तालुक्यातील अजूनही काही व्यक्तींचा शोध घेत असल्याचे बोलले जात आहे. जुन्नर तालुक्यातील ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या गळ्याभोवती कारवाईचा फास आवळू नये म्हणून त्यांच्या नातेवाईक मंडळीकडून पोलिसांवर राजकीय वजन वापरून तपास यंत्रणेला मायाजालात ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले
जात आहे.

दूध संकलन कमी, मात्र दुधाचे टँकर भरतात
सध्या जुन्नर तालुक्यात गावोगावी दूध केंद्रावर मिळत असलेले प्लास्टिक पिशवीतील दूध भेसळयुक्त तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील काही गावांत दैनंदिन दूध संकलन दोन ते तीन हजार लिटर असताना दररोज 12 ते 15 हजार लिटर दुधाचे टँकर कसे भरून जातात, हा संशोधनाचा विषय आहे.

जुन्नरमधील सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान
दूध भेसळीच्या या रॅकेटमध्ये दुग्ध व्यावसायिक, दूध डेअरी संघ यांच्याशी निगडित अनेक व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असू शकतो. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील दूध भेसळीचे रॅकेट चालवणार्‍या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे हे पोलिसांसाठी आव्हान असल्याची चर्चा आहे.

Back to top button