पिंपरी : कचरा सेवाशुल्कपोटी आजपासून घरटी दरमहा 60 रुपये | पुढारी

पिंपरी : कचरा सेवाशुल्कपोटी आजपासून घरटी दरमहा 60 रुपये

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  प्रत्येक घरातून दरमहा 60 रुपयांची वसुली शनिवार (दि.1) पासून केली जाणार आहे. वर्षभराची 720 रुपयांची रक्कम निवासी मिळकतकराच्या बिलात समाविष्ट केली जाणार आहे. दुकाने व इतर व्यावसायिकांना दरमहा 90 ते 2 हजार रूपये असे शुल्क आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या 8 एप्रिल 2016 च्या अधिसूनचेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 लागू करण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा दररोज जमा केला जातो. कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिकेने जनजागृतीसाठी संस्थांही नेमल्या आहेत. त्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधीचा खर्च
करीत आहे.

राज्य शासनाच्या 1 जुलै 2019 च्या स्वच्छता व आरोग्य उपविधी अनुसूचीनुसार पालिकांसाठी उपयोगकर्ता शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यानुसार पालिकेने 20 ऑक्टोबर 2021 च्या सर्वसाधारण सभेने नागरिकांकडून सेवा शुल्क वसुली प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजवाणी प्रशासकीय राजवटीत शनिवारपासून केली जात आहे.

सेवाशुल्क वसुलीसह दंडात्मक कारवाई करणार
शहरातून 1 एप्रिलपासून कचरा संकलनासाठी सेवाशुल्क आकारले जाणार आहे. तसेच, ओला व सुका कचरा वेगवेगळा न दिल्यास 50 ते 50 हजार इतका दंड केला जाणार आहे. दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणार्‍या हाऊसिंग सोसायट्यांनी स्वत:चा कंपोस्टींग प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यासाठी पालिका विविध प्रकारे सहकार्य करीत प्रोत्साहन देत आहे. नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता घंडागाडीत ओला व सुका असा वेगळा करून द्यावा, स्वच्छतेची शिस्त अंगी बाळगावी, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Back to top button