लगेच गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही ! अजित पवारांनी वडेट्टीवारांना फटकारले | पुढारी

लगेच गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही ! अजित पवारांनी वडेट्टीवारांना फटकारले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीनच दिवस झाले आहेत, पोटनिवडणुकीसाठी कोणी लगेच गुडघ्याला बाशिंग बांधण्याची गरज नाही, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावरून महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून नेत्यांमध्येच रणकंदन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारामती होस्टेल येथे शुक्रवारी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, गिरीश बापट यांना जाऊन आज फक्त तिसरा दिवस आहे. इतकी काय यामध्ये घाई आहे. काही माणुसकी प्रकार आहे की नाही. लोकं म्हणतील, यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची आहे की नाही, असे म्हणत अजित पवार यांनी वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. माझे संभाजीनगरमधील नागरिकांना सांगणे आहे की, कोणी जर तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला थारा देऊ नका. तसेच महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी संभाजीनगरमधील वातावरण बिघडेल, असे विधान कोणी करू नये, असे आवाहन त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले.

बापट कुटुंबीयांचे केले सांत्वन
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन बापट कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी खासदार बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सगळ्यांमध्ये मिसळून राहणारं ते व्यक्तिमत्त्व होते. मैत्री सांभाळण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आमच्यात अनेकदा बैठका झाल्या, पण कधीच ताणतणाव झाला नाही. बापटसाहेब अत्यंत मिश्कील होते.

Back to top button