‘उपग्रह वाहन मिशन’मध्ये पुण्याच्या विराजचे योगदान | पुढारी

‘उपग्रह वाहन मिशन’मध्ये पुण्याच्या विराजचे योगदान

महर्षिनगर; पुढारी वृत्तसेवा : तामिळनाडूतील पट्टीपुलम येथे ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उपग्रह वाहन मिशन : 2023’अंतर्गत (एपीजेएकेएसएलव्ही) नुकतेच रॉकेट प्रक्षेपण यशस्वीपणे पूर्ण झाले. या रॉकेट बनविण्याच्या अभ्यास प्रक्रियेत मार्केट यार्ड भागातील विराज दीपक शहा हा सहभागी झाला होता. याबद्दल त्याचे परिसरातून कौतुक होत आहे. देशातील पहिले हायब्रिड रॉकेट व दीडशे विद्यार्थ्यांनी हा उपग्रह तयार केला आहे. अवकाशातील ओझोनचे थर आणि वातावरणात होणारे बदल, याविषयी या प्रकल्पाच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येणार आहे. विराज हा विश्वकर्मा महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत आहे.

वाहन मिशन रॉकेटनिर्मितीत त्याचा मोठा सहभाग आहे. रॉकेटमधील कोडिंगच्या कामात विराजने योगदान दिले आहे. अकरावीत शिकण घेत असताना त्याने स्वयंअभ्यासातून रॉकेटनिर्मितीसाठी कोडिंग विषयाचा तज्ज्ञ म्हणून यश मिळविले आहे. विराजला डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या कार्यशाळेतील कोडिंगचा अभ्यास अतिशय उपयुक्त ठरला होता. यातून फाउंडेशनच्या माध्यमातून इस्रो संस्थेमध्ये रॉकेट प्रक्षेपणासाठी त्याला काम करता आले.

मला स्वतः संपूर्ण रॉकेट तयार करायचे असून, त्यासाठी भविष्यात अवकाशीय क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे. गतवर्षी एक रॉकेट अवकाशात पाठविले होते. तेव्हाचा ओझोनचा स्तर व आताच्या रॉकेटच्या माध्यमातूनचा ओझोनचा स्तर, याबाबत संशोधन होणार आहे.

                                     – विराज शहा,
                             रॉकेट अभ्यासक, विद्यार्थी

Back to top button