पुणे : 50 टक्के कर्मचार्‍यांवरच चालतो रेशनचा कारभार !

पुणे : 50 टक्के कर्मचार्‍यांवरच चालतो रेशनचा कारभार !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात पुरवठा विभागात मंजूर पदांपैकी सुमारे पन्नास टक्के अधिकारी आणि कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मात्र, ही पदे भरली जात नाहीत. परिणामी, 50 टक्के कर्मचार्‍यांवरच कामकाज सुरू आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात विलंब होत आहे.

जिल्ह्यात सुमारे 7 लाख 69 हजार 224 शिधापत्रिकाधारक असून, त्यातील केवळ 50 हजार 515 शुभ्र शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही. केशर शिधापत्रिकाधारक 1 लाख 41 हजार 515 असून, त्यांनाही धान्याचा लाभ दिला जात नाही. त्यामुळे 5 लाख 77 हजार 194 शिधापत्रिकाधारकांना प्रत्यक्ष धान्याचा लाभ मिळतो. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून धान्याचा पुरवठा करण्याची कार्यवाही चालते. जिल्ह्यात जिल्हापुरवठा अधिकारी ते वाहनचालक, अशी सुमारे 82 पदे मंजूर आहेत.
जिल्हा पुरवठा विभागात एकूण 82 मंजूर पदांपैकी 42 पदे भरलेली आहेत. मूळ पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांव्यतिरिक्त पुरवठा विभागात महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना नियुक्ती दिली जाते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागात मूळ पुरवठा विभागाचे केवळ 15 अधिकारी व कर्मचारी आहेत, तर महसूल विभागाचे 27 अधिकारी व कर्मचारी आहेत.

जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला आवश्यक धान्याची मागणी केली जाते. त्यानुसार धान्याचा पुरवठा होत असतो. हे धान्य गोदामातून तालुका गोदामात पाठविले जाते. त्या ठिकाणावरून स्वस्त धान्य दुकानदार धान्य उचलत असतात. त्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 823 दुकानांतून लाभार्थी धान्य घेतात. परंतु, विभागात सध्या 40 पदे रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून धान्याची उचल वेळेवर होत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य वेळेवर मिळत नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news