पुणे
पुणे : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अभियंत्याला 5 वर्षे सक्तमजुरी
पुणे : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या तत्कालीन वरिष्ठ अभियंता सत्यजित रामचंद्र दास (वय 63, रा. लोणी काळभोर) याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने पाच वर्षांची सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड ठोठावला. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला. मध्य रेल्वेच्या घोरपडी येथे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर म्हणून कार्यरत असताना दास यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा 37 लाख 54 हजार 353 रुपयांची (48.23 टक्के) बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी काम पाहिले. त्यांनी बारा साक्षीदार तपासले.