पुण्यात महिन्यात ‘एच3एन2’चे 108 रुग्ण, 7 सक्रिय रुग्ण | पुढारी

पुण्यात महिन्यात ‘एच3एन2’चे 108 रुग्ण, 7 सक्रिय रुग्ण

पुणे : महिनाभरात इन्फ्लूएन्झा विषाणूच्या ‘एच3एन2’ या उपप्रकाराचा संसर्ग वाढत आहे. फ्लूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. मार्चमध्ये शहरात ‘एच3एन2’च्या 108 रुग्णांची नोंद झाली. सध्या 7 सक्रिय रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तीन महिन्यांत 224 रुग्ण आढळून आले आहेत.

‘एच3एन2’च्या पार्श्वभूमीवर फ्लूसदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, विनाविलंब उपचार यावर भर देण्यात येत आहे. राज्यात इन्फ्लूएंझा निदानासाठी 69 प्रयोगशाळा कार्यान्वित असून, त्यापैकी 36 प्रयोगशाळा शासकीय आणि 33 खासगी आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. शहरातील संशयित नमुने 12 स्वॅब संकलन केंद्रांवरून तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात येत आहेत. मार्च महिन्यात 5438 संशयित रुग्णांची तपासणी करून नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी 108 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापूर्वी जानेवारी महिन्यात एच3एन2’चे 27, तर फेब्रुवारी महिन्यात 89 रुग्ण आढळले होते. शहरात दोन बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

दुहेरी संसर्गाचा एकही रुग्ण नाही
कोव्हिड आणि ‘एच3एन2’च्या संसर्गाची लक्षणे सारखीच असल्याने नमुने काटेकोरपणे तपासले जात आहेत. राज्यात काही रुग्णांमध्ये एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, पुण्यात असा एकही रुग्ण 31 मार्चपर्यंत आढळून आलेला नाही, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. सध्या दररोज एच3एन2 चे केवळ 2 ते 3 रुग्ण आढळून येत आहेत.

‘एच3एन2’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, थकवा ही लक्षणे तीन-चार दिवसांपर्यंत टिकतात. खोकला अथवा घशातील खवखव मात्र तीन आठवड्यांपर्यंत कायम राहू शकते. नागरिकांनी कोणतीही लक्षणे अथवा दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

                     – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी

Back to top button