

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने रेडिरेकनरच्या दरात यंदा कोणतीही वाढ अथवा घट केली नाही, त्यामुळे गेल्या वर्षीचेच दर सन 2023-24 या वर्षाला लागू असणार आहेत. यंदा रेडिरेकनर दर 'जैसे थे' ठेवण्यात आले असले, तरी नेहमीप्रमाणे शहरातील कोरेगाव पार्क भागाने सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम राखली आहे.
मेट्रो प्रकल्पामुळे विष्णूशास्त्री चिपळूणकर (विधी महाविद्यालय) रस्त्यालगत असलेला कांचनगल्ली, अशोकपथ परिसर हा भाग दुसर्या क्रमांकावर आहे. तिसर्या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक 15) आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गावरील पौड रस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरातील दर हे तेजीत आहेत.
कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या परिसरातील दर हे नेहमी रेडिरेकनरच्या दरात आघाडीवर असतात. कोरेगाव पार्कमधील ओव्हर ब्रिज ते बंडगार्डन पूल हा भाग दरामध्ये पहिल्या स्थानावर असतो. या भागातील प्रतिचौरस फूट दर 16 हजार 39 रुपये आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गात मेट्रो धावू लागल्याने या मार्गालगत असलेल्या प्रभाग रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यांबरोबरच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरीलऐदर चढे आहेत.
विधी महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या कांचनगल्ली, अशोकपथ परिसरात हे दर 15 हजार 288 रुपये प्रति चौरस फूट आहेत. तिसर्या क्रमांकावर असलेल्या प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक 15) या भागातील दर 14 हजार 312 रुपये प्रतिचौरस फूट आहेत. आयकर रस्त्यावरील दर हे 13 हजार 718 रुपये प्रतिचौरस फूट आहेत. मेट्रो सुरू झालेल्या कर्वे रस्त्यावरील रेडिरेकनरचे दर चढे आहेत. या ठिकाणचे दर प्रतिचौरस फूट 13 हजार 835 रुपये आहेत. पौड रस्त्यावरील दर 11 हजार 485 रुपये आहेत. तसेच कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचे दर 12 हजार 830 रुपये आहेत.
रेडिरेकनरचे दर (प्रतिचौरस फूट)
मध्यवर्ती पेठांतील दर
परिसर – दर
कसबा पेठ – 6720
शुक्रवार पेठ – 7570
सदाशिव पेठ/नवी पेठ -9052
सोमवार पेठ – 7653
बुधवार पेठ – 8565
मंगळवार पेठ- 8169
रविवार पेठ – 6055
रास्ता पेठ – 6618
गुरुवार पेठ – 7027
गंजपेठ – 6066
नाना पेठ – 6086
नारायण पेठ – 8263
शनिवार पेठ- 8744
शहरातील प्रमुख भाग
परिसर – दर
कोथरूड – 11,485
बाणेर – 11,301
पर्वती – 11,230
कात्रज – 6420
सिंहगड रस्ता – 6609
बालेवाडी – 9330
वडगाव खुर्द – 7508
वडगाव बुद्रुक – 6074
वारजे – 7340
बिबवेवाडी- 8052
पाषाण – 9041
आंबेगाव खुर्द – 5166
उंड्री – 6409
आंबेगाव बुद्रुक – 5931
शिवणे – 4360
हडपसर – 7767
हिंगणे खुर्द – 6869
धनकवडी – 5500